भुसावळ नगरपरिषदेच्या कारभाराची ‘श्वेतपत्रिका’ काढा : शिशिर जावळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भुसावळ (4 जुलै 2026) : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग दर्जा असलेल्या भुसावळ नगरपरिषदेत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही शहरातील नागरिक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. या कारभाराची सखोल चौकशी करून मागील 15 वर्षांच्या कामांची ‘श्वेतपत्रिका’ प्रसिद्ध करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निधी गेला कुठे? नागरिकांचा सवाल
शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, भुसावळ नगरपरिषदेत शेकडो कोटींचे आर्थिक व्यवहार होतात आणि शासनाकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त होतो मात्र शहरातील रस्ते, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेची अवस्था अत्यंत बिकट आहे. शहरात झालेली अनेक विकासकामे दर्जाहीन आहेत तर काही ठिकाणी कामांचा पूर्णपणे अभाव आहे. जनतेच्या करातून जमा झालेला पैसा नेमका कुठे जिरवला जातोय, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा
जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठविलेल्या आपल्या तक्रार मागणी पत्रात तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यात नगरपरिषदेच्या मागील 15 वर्षांच्या कामकाजाची व विकासकामांची उच्चस्तरीय चौकशी करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्यात यावी, प्राप्त निधी, खर्च आणि कामाचा दर्जा याचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर जाहीर करावा तसेच कामातील अक्षम्य दिरंगाई आणि भ्रष्टाचारासाठी जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
भुसावळकरांच्या संयमाचा अंत पाहू नये
शिशिर जावळे यांनी शहराच्या हितासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी विनंती केली आहे. या मागणीमुळे भुसावळच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
