एसआयआर अभियानासाठी राज्यातील पहिलाच समन्वय व मार्गदर्शन मेळावा भुसावळात

मंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकारातून समस्या निराकरण, प्रशिक्षण आणि समन्वयाला नवी दिशा


भुसावळ (4 जुलै 2026) : एसआयआर अभियानाची अंमलबजावणी अधिक प्रभावी, सुकर आणि समन्वयपूर्ण व्हावी या उद्देशाने भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेला एसआयआर अभियान समन्वय व मार्गदर्शन मेळावा उत्स्फूर्त वातावरणात पार पडला. शासन, प्रशासन आणि प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत विविध घटकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांच्या अडचणी जाणून घेणे, शंकांचे निरसन करणे आणि कामकाजाला गती देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विशेष म्हणजे, अशा स्वरूपाचा राज्यातील हा पहिलाच मार्गदर्शन मेळावा ठरला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. त्यांनी एसआयआर अभियानात कार्यरत असलेल्या बीएलओ, बीएलए, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सहाय्यक शिक्षक, निवडणूक कर्मचारी तसेच संबंधित घटकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. अनेक प्रश्नांवर त्यांनी तत्काळ संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना देत सकारात्मक पावले उचलण्याचे निर्देश दिले.

शंकांचे निरसन व समन्वयासाठी व्यासपीठ
या अभिनव मेळाव्याची संकल्पना भाजपा वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.नितू पाटील यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेला मंत्री संजय सावकारे यांनी तातडीने मान्यता देत अल्पावधीत या उपक्रमाचे आयोजन केले. त्यामुळे अभियानात कार्यरत कर्मचार्‍यांना अनुभवांची देवाणघेवाण, शंकांचे निरसन आणि परस्पर समन्वयासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.

अनेक बाबी झाल्या स्पष्ट
मेळाव्यात तेजेंद्र महाजन आणि हिरानंद मूलचंदानी यांनी एसआयआरअभियानातील विविध तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले तसेच प्रत्यक्ष कामकाजातील महत्त्वाच्या मुद्यांवर सखोल चर्चा झाली. या मार्गदर्शनामुळे इङज आणि त्यांच्या सहाय्यकांना निवडणूक प्रक्रियेतील अनेक बाबी अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास मदत झाली.

यांची मेळाव्यास उपस्थिती
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार नीता लबडे, गटविकास अधिकारी डॉ.कुलदीप ठाकरे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत (अण्णा) बाविस्कर, जिल्हा सचिव परीक्षीत बर्‍हाटे, तालुकाध्यक्ष गोलू पाटील व प्रशांत पाटील, शहराध्यक्ष किरण कोलते व संदीप सुरवाडे, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मुकेश मोरे, भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितू पाटील तसेच खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हा सचिव जीवन महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भुसावळ तालुक्यातील नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, इङज, इङ-, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, सहाय्यक शिक्षक, निवडणूक शाखेतील कर्मचारी आणि संबंधित घटकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत कर्मचार्‍यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी समन्वय, प्रशिक्षण आणि समस्या निराकरणासाठी असा उपक्रम राबविल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. एसआयआर अभियान अधिक प्रभावी, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वाचा मैलाचा दगड ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. प्रस्तावना डॉ. नितू पाटील यांनी तर सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी केले. जीवन महाजन यांनी आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !