भडगाव तालुक्यातील गावांचा पोकरा योजनेत समावेश करा : भडगाव तहसीलदारांना शेतकरी संघटनेचे निवेदन
भडगाव (6 जुलै 2026) : शासनाच्या पोकरा योजनेत संपूर्ण भडगाव तालुक्याचा समावेश करावा, शासनाच्या योजनेचा लाभ शेतकर्यांना द्यावा या मागणीचे निवेदन भडगाव तहसीलदार शीतल सोलाट यांना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, रामकृष्ण माळी यांच्यासह पदाधिकार्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
काय आहे मागण्या
भडगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेले आहे की, भडगाव तालुक्याचा मुख्य व्यवसाय शेती असल्याने तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक व इतर संकटांवर मात करीत मोठया कष्टाने पिकांचे उत्पादन घेत असता मात्र कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटासह शेतमालाला उत्पादन इतकाही बाजार भाव मिळत नसल्याने शेती क्षेत्र व शेतकरी उध्वस्त होत आहेत.

भडगाव तहसीलदारांना निवेदन
शेतकर्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात जागतिक बँक अर्थ सहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबविला जात आहे परंतु या योजनेत भडगाव तालुक्यातील 59 गावांपैकी फक्त 27 गावांचा समावेश (पोकरा योजनेत) आहे. उर्वरित 32 गावांचा समावेश या योजनेत करून तालुक्यातील हजारो शेतकर्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा मागणी संबंधीचे निवेदन शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील यांनी भडगाव तहसीलदार यांना दिले आहे.
संपूर्ण गावाचा समावेश करावा
शेतकर्यांसाठी ही पोकरा योजना अत्यंत गरजेची असल्यामुळे शेतकर्यांकडुन उर्वरित गावे या प्रकल्पात नव्याने समाविष्ट करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी(पोकरा) योजनेत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्रे, पीक संरक्षक उपकरणे, काढणी पश्चात उपकरणे, पेरणी यंत्र, कांदा चाळ,शेडनेट, पॉलिहाऊस, फळबाग लागवड, बांबु लागवड, नवीन विहीर, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, गोड्या पाण्यातील मत्स्य पालन, पंप संच व पाईप, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, गांडूळ व सेंद्रिय खत निर्मिती, वृक्ष लागवड, भूजल पुनर्भरण, मृद व जलसंधारण इत्यादी कामांचा समावेश आहे त्यामुळे ही योजना तालुक्यातील सर्वच गावातील शेतकर्यांना वरदान ठरणार आहे त्यामुळे राज्य शासनाने पोकरा योजनेत भडगाव तालुक्यातील संपूर्ण गावांच्या समावेश करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
याप्रसंगी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, रामकृष्ण माळी, सरदारसिंग पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.