रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
पाच प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी जळगावचा गौरव
जळगाव (11 जुलै 2026) : रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट, जळगाव यांनी सामाजिक सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि नेतृत्वाच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रोटरी जिल्हा 3030च्या जिल्हा रोटरी वर्ष 2025-26 – पुरस्कारात तब्बल पाच प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावत जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या पुरस्कारांचे वितरण रोटरी जिल्हा 3030चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन नाना शेवाळे तसेच डिस्ट्रिक्ट रोटरॅक्ट रिप्रेझेंटेटिव्ह रो. राघव पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाभरातील विविध रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरी जिल्हा 3030 हा नाशिक ते नागपूरपर्यंत विस्तीर्ण भौगोलिक क्षेत्र व्यापणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यांतर्गत सुमारे 110 रोटरॅक्ट क्लब कार्यरत आहेत. या सर्व क्लबमधून उत्कृष्ट सेवा, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी नेतृत्वाच्या आधारे रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईट, जळगाव यांची निवड होणे ही जळगावसाठी अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे.क्लबच्या ’नन्हीकली’ या शिक्षणविषयक उपक्रमाला ‘सर्वोत्कृष्ट साक्षरता व शिक्षण संस्था’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच ’आभा सेवा’ या समाजोपयोगी उपक्रमाला ’सर्वोत्कृष्ट क्लब प्रकल्प’ पुरस्काराने गौरविण्यात आले.याशिवाय क्लबच्या अध्यक्षा रोटरॅक्टर भूमिका नाले यांना त्यांच्या प्रभावी नेतृत्व, नियोजन आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल ’उत्कृष्ट अध्यक्ष हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
क्लबला ’जिल्हा उपक्रमांसाठी सर्वोत्तम सहाय्यक क्लब’आणि डीआरआर प्रशस्तिपत्र’ ही प्रतिष्ठेची प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली.क्लबच्या या यशामागे प्रत्येक सदस्याची अथक मेहनत, सेवाभाव, एकजूट आणि समाजाप्रती असलेली निष्ठा असल्याची भावना पदाधिकार्यांनी व्यक्त केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
