प्रभू श्रीराम केवळ प्रेमाच्या बंधनाने प्रसन्न होतात : मदन मोहनजी महाराज


भुसावळ (12 जुलै 2026) : शहरातील लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे रामकथा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या पाचव्या दिवशी भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. पाचव्या दिवसाची कथा सांगताना परम पूज्य मदन मोहनजी महाराज यांनी श्रीराम वनवास आणि केवट प्रसंग अत्यंत रसाळ भाषेत मांडला. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामांचे जीवन प्रत्येक मानवाने आदर्श मानून त्याचे अनुकरण केले पाहिजे. मानवाला सन्मार्ग दाखवण्यासाठीच नारायणाने मनुष्य रूपात पृथ्वीवर अवतार घेऊन लीला केल्या, असे विवेचन महाराजांनी यावेळी केले

मोहनजी महाराज म्हणाले की, स्वतः भगवान शंकर माता पार्वतीला म्हणतात की, प्रभूंचे मर्म कोणालाही समजलेले नाही. अगदी 24 तास सोबतीला असणारे शेषनागाचे अवतार लक्ष्मणजींनाही जे मर्म समजले नाही, ते एका निरक्षर केवटाने जाणले.

केवटाचे समर्पण: ‘मांगी नाव न केवट आना, कहही तुम्हारा मर्म मै जाना’ या चौपाईतून केवटाचा निस्सीम भाव प्रकट होतो. श्रीरामांच्या चरणांची महती सांगत, जोपर्यंत पाय धुणार नाही तोपर्यंत नावेत बसवणार नाही, हा केवटाचा आग्रह त्याच्या अतूट विश्वासाचे प्रतीक आहे.

भाविकांचे डोळे पाणावले
हा भावूक प्रसंग ऐकताना कथा मंडपातील उपस्थित शेकडो भाविकांचे डोळे अश्रूंनी दाटून आले. हा सोहळा रोज दुपारी तीन ते संध्याकाळी सहा या वेळेत सुरू आहे. भुसावळ शहरासह परिसरातील जवळच्या गावांमधील भाविक दररोज मोठ्या संख्येने या कथेचा लाभ घेण्यासाठी येत आहेत. पाचव्या दिवसाच्या विशेष कथेसाठी पानसेमल (मध्य प्रदेश) येथूनही शेकडो भाविक खास भुसावळात दाखल झाले होते. कथा समाप्तीनंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या महोत्सवाचे आता अवधा एक दिवस उर्वरित असून संपूर्ण परिसराला भक्तिमय स्वरूप आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !