रावेर तालुका हादरला : अनैतिक संबंधातून मित्रालाच संपवले ; दोघांना बेड्या

आरोपींनी मयत तरुणाला दुचाकीवरून नेत आधी पाजली दारू व नंतर आवळला गळा


Raver Taluka Shaken : Man Killed by Friend Over Illicit Affair ; Two Arrested रावेर (12 जुलै 2026) :  मित्राच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून दोघांनी मित्राला दारू पाजली व नंतर त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यात घडली. या प्रकरणी रावेर पोलिसांनी तातडीने तपासचक्रे फिरवत दोन आरोपींना अटक केली. शेख कुर्बान (30) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. गणेश संजय घोरपडे (27, भोर, ता.रावेर) व मेघराज वसंत सांगळे (29, भोर, ता.रावेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

रावेर पोलिसांनी खुनाचे गुपित केले उघड
रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात शेतात 30 वर्षीय मजुराचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी ओळख पटवल्यानंतर मयत शेख कुर्बान (30) असल्याचे निष्पन्न झाले तर मयत हा 9 जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. शनिवार, 11 जुलै रोजी सकाळी नांदूरखेडा शिवारातील कपाशीच्या शेतात कुर्बानचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला.

मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंध : धमकी केली खरी
खुन प्रकरणातील मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल 2026 मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याला मारहाण करण्यात आली व घटनेचा राग मनात धरून याने मयताला तुझ्या पत्नीवर माझे प्रेम आहे व तू आमच्या संबंधांमध्ये आला तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. 9 जुलैच्या रात्री संशयीत गणेश घोरपडे व मेघराज वसंत सांगळे यांनी मयताला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याची हत्या  केली आणि मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून दोघे पसार झाले. खून प्रकरणी मयताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा.उचंदा, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

24 तासात दोघे आरोपी जाळ्यात
खून प्रकरणी सुरूवातीला प्रकरणात मेघराज वसंत सांगळे याला शनिवारी अटक करण्यात आली तर रविवारी मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे याला सागवानी, तहसील जयशिनगर, जि.सागर, मध्यप्रदेश येथून उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अवघ्या 24 तासात रावेर पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !