अंगावर काटा आणणारी मर्डर मिस्ट्री : प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या मृतदेहाचे तीने तुकडे जंगलात फेकले
11 महिन्यांनी रबाळे पोलिसांनी कॉल्स डिटेल्सने केला खुनाचा गुन्हा उघड
मुंबई (मंगळवार, 14 जुलै 2026) : अनैतिक संबंधाआड येणार्या पतीची पत्नीने प्रियकरासोबत मिळून हत्या केली व मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकून दिली. तब्बल 11 महिने तपासावर असलेल्या या गुन्ह्याचे बिंग अखेर पोलिसांनी उलगडले. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाह (40) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30 वर्ष, रा.घणसोली) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. बलीराम सूर्यनाथ कुशवाह (वय 50 वर्ष) असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
अनैतिक संबंध अन् हत्येचा रचला कट
मयत बलीराम कुशवाह हे ऐरोली येथील यादव नगर परिसरात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह सुखाचा संसार करत होते मात्र याच दरम्यान त्यांची पत्नी सुनिता हिचे घणसोली परिसरातील रिक्षा चालक राहुल प्रजापतीसोबत सूत जुळले. या दोघांच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागताच पती बलीराम यांनी याला तीव्र विरोध केला. रोजच्या घरगुती वादामुळे सुनिता आणि राहुलने बलीराम यांना कायमचे मार्गातून दूर करण्याचा कट रचला. हा डाव साधण्यासाठी सुनिताने आधी आपल्या दोन्ही मुलांना दोन दिवसांसाठी मावशीकडे पाठवून घर रिकामे केले.

घरातच शरीराचे केले तीन तुकडे
9 ऑगस्ट 2025 च्या रात्री बलीराम घरात गाढ झोपेत असताना सुनिता आणि राहुलने त्यांच्यावर हल्ला केला. दोघांनी प्रथम त्यांचा गळा आवळला आणि त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर सपासप वार करून त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावणे हे आरोपींसमोर मोठे आव्हान होते. त्यासाठी त्यांनी घरातच बलीराम यांच्या मृतदेहाचे तीन तुकडे (मुंडके, धड आणि पाय) केले. हे तुकडे वेगवेगळ्या गोण्यांमध्ये आणि चादरीत घट्ट गुंडाळले. त्यानंतर मध्यरात्रीच्या अंधाराचा फायदा घेत राहुलच्या रिक्षातून हे तुकडे ‘गवळी देव’ डोंगर परिसरातील दाट झाडीमध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी फेकून दिले.
11 महिन्यांचा लपंडाव आणि भावाचा संशय
हत्येनंतर सुनिताने आपले यादव नगरमधील घर भाड्याने दिले आणि मुलांसह ती घणसोली येथे प्रियकर राहुलसोबत राहू लागली. तब्बल आठ महिन्यांनी जेव्हा बलीराम यांचा भाऊ गावाहून आला, तेव्हा त्याने भावाबाबत विचारणा केली. सुनिताने ते भांडण करून घर सोडून गेले, असे सांगून वेळ मारून नेली मात्र संशय बळावल्याने भावाने एप्रिल 2026 मध्ये रबाळे एमआयडीसी पोलिसात बलीराम बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
‘कॉल डिटेल्स’ने सत्य समोर
गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून सुनिता आणि राहुल या दोघांनीही आपले जुने मोबाईल हँडसेट आणि सिमकार्ड बदलून टाकले होते. मात्र, पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास सुरू केला, तेव्हा राहुलच्या नव्या क्रमांकावरून केवळ आणि केवळ सुनिताशीच सतत संपर्क होत असल्याचे ’कॉल डिटेल रेकॉर्ड’ वरून स्पष्ट झाले. पोलिस चौकशीदरम्यान सुनिता दरवेळी पतीबाबत वेगवेगळी आणि विसंगत माहिती देत होती. संशय वाढल्याने पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पोलिसी खाक्या दाखवला. अखेर पोलिसांच्या कचाट्यात सापडलेल्या या जोडप्याने आपल्या गुन्ह्याची थरारक कबुली दिली.
मृतदेहाच्या अवशेषांचा शोध सुरू
आरोपींच्या कबुलीनंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी गवळी देव डोंगर परिसरात मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे मात्र या धक्कादायक घटनेला आता 11 महिने उलटून गेले असल्याने पुरावे आणि मानवी अवशेष शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे.
