धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : गावठी कट्टा व तीन जिवंत काडतूसासह आरोपी जाळ्यात
धुळे (13 जुलै 2026) : धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या ताब्यातून तीन जिवंत काडतूस व गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सोमवार, 13 जुलै 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना शहरात अवैध शस्त्रांची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मुंबई-आग्रा महामार्गावरील अभय कॉलेज परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी संशयीत सोमनाथ भिका पाटील (32, रा.देवभाने, ता.धुळे) व शस्त्र विक्रेता दीपक दगडू जगताप (25, रा.साई प्रसाद कॉलनी, अभय कॉलेज जवळ, धुळे) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून 40 हजार रुपये किंमतीचा एक देशी गावठी कट्टा व तीन हजार रुपये किंमतीची तीन जिवंत काडतूस मिळून 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे, पोलीस अंमलदार सदेसिंग चव्हाण, तुषार सूर्यवंशी, पंकज खैरमोडे, अमोल पाटील, अतुल निकम, जगदीश सूर्यवंशी आणि सिद्धार्थ निकम आदींच्या पथकाने केली.
