रावेर पोलिसांची तत्परता : अमरावतीत ट्रक चालकाचा खून करून पसार होणार्या संशयीताला बेड्या
Prompt action by Raver police: Suspect arrested while fleeing after murdering a truck driver in Amravati. रावेर (शुक्रवार, 17 जुलै 2026) : अमरावती ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत ट्रक चालकाची गळा आवळून हत्या करीत नंतर ट्रकसह चालकाला पेटवून संशयीत पसार झाला होता. हा संशयीत रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती अमरावती ग्रामीण पोलिसांनी
जळगाव अधीक्षकांना कळवली व नंतर रावेर पोलिसांनी समय सुचकता पंजाबकडे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अटक केली. मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (48, रा.महमद, गाव मंध्रवाला, ता.अजनाडा, जि.अमृतसर, पंजाब) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे खून प्रकरण
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखल सावंगी प्रवासी निवार्याजवळ उभ्या असलेल्या ट्रक (क्रमांक एम.एच.29 टी.2903) ला आग लागल्याचा व त्यात चालकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेत उमेश गौरीशंकर मिश्रा या ट्रक चालकाचा मृत्यू झाला होता. बुधवार, 15 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनास्थळाची पाहणी तसेच पंचनामा आणि प्राथमिक तपासात अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. मृत्यूचे खरे कारण लपविण्यासाठी तसेच गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने ट्रकच्या कॅबिनला आग लावण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर या गंभीर गुन्ह्याचा तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला.


संशयीत निष्पन्न : रावेर पोलिसांची सतर्कता
तपासादरम्यान संशयिताची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी सुमारे 8.48 वाजता अमरावती ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. संशयित जळगाव जिल्ह्यातील रावेर रेल्वे स्थानक परिसरात असल्याची आणि तो पंजाबकडे जाणार्या रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती तिकडून देण्यात आली. माहितीचे गांभीर्य ओळखून जळगाव पोलिसांनी तत्काळ रावेर पोलीस ठाण्याला सतर्क केले.
आर्थिक व्यवहारातून केली हत्या
रावेर पोलिसांकडे संशयिताचा केवळ एक अस्पष्ट फोटो उपलब्ध होता. त्यावरून त्याची ओळख पटविणे हे मोठे आव्हान होते मात्र, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी आणि कर्मचार्यांनी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचत प्रत्येक संशयित व्यक्तीची बारकाईने पडताळणी केली. अखेर संशयिताची खात्री करून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत संशयिताने आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून ट्रक चालकाचा गळा दाबून खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह ट्रकच्या कॅबिनमध्ये ठेवून आग लावल्याची प्राथमिक कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कबुलीनंतर तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली.
आयशर वाहन जप्त
मनप्रीतसिंह कश्मीरसिंह रंधावा (48) हा सध्या रावेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून कारवाईदरम्यान संशयिताच्या ताब्यातून पांढर्या रंगाची आयशर मालवाहू गाडी जप्त करण्यात आली आहे. या वाहनाचा गुन्ह्यातील वापर, तसेच त्यातून आणखी काही पुरावे मिळतात का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताचा ताबा घेण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांचे विशेष तपास पथक जळगावकडे रवाना झाले आहे.
रावेर पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
अमरावती ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या अल्प माहितीनंतरही केवळ एका अस्पष्ट छायाचित्राच्या आधारे संशयिताला अल्पावधीत अटक करण्यात रावेर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले. या वेगवान कारवाईमुळे संशयिताचा पंजाबकडे पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात रावेर पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि व्यावसायिक कौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.