आभाळ रूसले, इंद्रदेवाला मनवण्यासाठी भुसावळात निघाली ‘धोंडी’ यात्रा

श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे पारंपरिक कडुनिंबाच्या पालाचा पेहराव करून कार्यकर्त्यांनी जागवली करुणा


भुसावळ (शनिवार, 18 जुलै 2026) : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. दुबार पेरणीचे संकट उंबरठ्यावर आहे. आभाळ रुसल्याने वरुणदेवाची अर्थात इंद्राची आळवणी करण्यासाठी भुसावळाीतील ‘श्री राधाकृष्ण प्रभात फेरी’तर्फे शनिवारी ‘धोंडी’ यात्रा काढण्यात आली.

शहरासह परिसरात चांगला पाऊस पडावा आणि वरुणराजा प्रसन्न व्हावा यासाठी यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पावसामुळे पृथ्वीवरील सर्व जीवांना जीवन मिळावे आणि पर्यावरणाचा समतोल नेहमी राखला जावा तसेच शेतकरी राजा हा पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. या उदात्त हेतूने शनिवारी पहाटे 5.15 वाजता या धोंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले.


पारंपारिक पेहराव आणि जल्लोष
भुसावळच्या अष्टभुजा मंदिरापासून या प्रभात फेरीला आणि धोंडी यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी अत्यंत पारंपारिक पद्धतीचा अवलंब करत कडुनिंबाच्या पालाचा ड्रेस (पेहराव) परिधान केला होता. वाजत-गाजत निघालेल्या या धोंडीचे गावातील प्रत्येक गल्लीबोळात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी गल्लीतील नागरिकांनी धोंडीवर ‘पाणी’ टाकून देवाकडे मनोभावे प्रार्थना केली आणि पावसासाठी करुणा भाकली.

श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे काढण्यात आलेली धोंडी यात्रा अष्टभुजा मंदिर येथून निघून बद्री प्लॉट, गायत्री शक्तीपीठ-तुळसी नगर, नंदनवन कॉलनी, ओमप्रकाश चौधरी हॉस्पिटल, कन्हैयालाल प्लॉट 2, मार्गे पुन्हा अष्टभुजा मंदिरा जवळ धोंडी यात्रेचा समारोप करण्यात आला. अतिशय उत्साही आणि भक्तीमय वातावरणात ही यात्रा निघाली. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांनीही या धोंडी यात्रेचे जागोजागी स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला. ‘इंद्रदेव, वरुणदेव तसेच झुलेलाल देव आणि सर्व देवी-देवतांनी प्रसन्न व्हावे, अशी आळवणी यावेळी करण्यात आली.

यांचा उपक्रमात सहभाग
धोंडी यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, जे.बी.कोटेचा, महेश भालेराव, सुभाष शिरसाठ, किरण कोल्हे, श्याम अग्रवाल, जी.आर.ठाकूर, मदन बोरकर, पिंटू हेडा, बंडू हेडा, नरेंद्र लड्डा, श्याम काबरा, महेश पाटील, गोपाळ जांगीड तसेच प्रभात फेरीतील सर्व बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !