चुंचाळे ग्रामपंचायत कार्यालयाचा स्लॅब कोसळला : शिपाई थोडक्यात बचावला
यावल (सोमवार, 27 जुलै 2026) : यावल तालुक्यातील चुंचाळे येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून सोमवारी कार्यालयातील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ग्रामपंचायत कार्यालयातील शिपाई थोडक्यात बचावला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
चुंचाळे ग्रामपंचायत कार्यालयाची 30 वर्ष जुनी इमारत आहे. या इमारतीचा स्लॅब सोमवारी अचानक कोसळला यात कार्यालयातील शिपाई हा थोडक्यात बचावला आहे. यापूर्वीही याच जीर्ण इमारतीमुळे ग्रामपंचायत शिपाई मनीष पाटील हे जखमी झाले होते. त्या घटनेनंतर गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची प्रत्यक्ष पाहणी करून इमारतीच्या स्थितीची माहिती घेतली. तसेच या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्याकडेही आवश्यक पाठपुरावा करण्यात आला होता. तरीदेखील अद्याप नवीन इमारतीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, चुंचाळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच नौशाद तडवी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाची सध्याची इमारत वापरण्यास धोकादायक झाली असून, नागरिक आणि कर्मचार्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने नवीन ग्रामपंचायत इमारतीस मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.स्लॅब कोसळल्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांनीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आणखी एखादी मोठी दुर्घटना होण्यापूर्वी नवीन ग्रामपंचायत इमारतीचे काम तातडीने मंजूर करावे, अशी मागणी केली आहे.