यावल शहरात श्री महर्षी व्यास मंदिरावर गुरूपौर्णिमा उत्सव उत्साहात : हजारो भाविकांनी घेतले दर्शन
यावल (बुधवार, 29 जुलै 2026) : यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात गुरू पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासोनारायण भगवान की जय ! अशा जयघोषात बुधवारी संपूर्ण व्यास नगरी दुमदुमली होती.

हजारो भाविकांनी घेतले दर्शन
बुधवारी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम मंदिरात सुरू होते. मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. परिसरातील विविध गावातून आलेल्या दिंड्यांनी शहरवासीयांचे लक्ष वेधले. मंदिराचा गाभारा व समोरील दर्शनीभाग डाळींब व ओली खजुरांच्या आरासातून मंदिराचे सौंदर्य खुलून दिसत होते. आलेल्या भाविकांना खडीसाखर, बुंदीसह मसाली भात असा महाप्रसाद वितरण करण्यात आला.
दिवसभर विविध कार्यक्रम
आषाझशुध्द पौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमेनिमित्त बुधवारी यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिरात सकाळी 8 ते 10 या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा करण्यात आली. पूजेचा मान देवेंद्र फालक व दिशा फालक, शिवाजी बारी व हेमलता बारी, संतोष पाटील यांना देण्यात आला. मंदिरातील संपूर्ण धार्मिक विधी ब्रह्मवृंद महर्षी व्यास मंदिरातील पुजारी मुख्य पुजारी रघुनाथ बाविसे, भुवन बैरागी, अतुल बाविसे, मनिष बैरागी, सारंग बाविसे, महेश बयाणी, राजेंद्र बयाणी, मोरेश्वर बयाणी, सुनिल जोशी, निखील वैद्य, गोपाल बैरागी, मयुर जोशी, भूषण कुलकर्णी, मुळे गुरुजी, निशिकांत तांबोळी, भूषण बैरागी, हेमांशु बाविसे, अर्थव बयाणी, प्रसाद कुलकर्णी यांनी पार पाडली. नंतर भाविक, भक्तांकरीता गाभारा दशर्नासाठी उघडण्यात आला.
भाविकांना प्रसादाचे वाटप
भाविक भक्तांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. येथे 11 क्विंटलची बुंदी व 21 क्विंटल तांदूळाचा तिखट मसाली भाताचा महाप्रसाद काळा हनुमान मित्र मंडळाच्या सदस्यांनी हजारो भाविकांना वितरित केला. भाविकांना दर्शनार्थ अडचणी न येण्यासाठी सुमारे 100 स्वयंसेवक तथा यावल पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
मंदिरात दर्शनासाठी आलेल्या नगराध्यक्ष छायाताई पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, माजी नगराध्ध्यक्ष माधुरी फेगडे, नगरसेवक बाळु फेगडे सह विविध लोकप्रतिनिधींचे मंदिर संस्थानकडून शशीकांत देशमुख यांनी स्वागत केले.