भुसावळात पालिकेचा नालेसफाईच्या आश्वासनाला ‘खो’ : मनसेचा 7 ऑगस्टला ‘कचरा फेको’ आंदोलनाचा इशारा

पालिका प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांनी सहभागी होण्याचे दीपक सोनवणे यांचे आवाहन


Bhusawal Municipal Council’s promise of drain cleaning falls flat ; MNS threatens ‘Garbage Dumping’ protest on August 7 भुसावळ (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही नालेसफाईचे काम सुरू न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भुसावळ नगरपालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिका आवारात ‘कचरा फेको’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी दिली.

पावसाळ्याला सुरूवात होवूनही नालेसफाईचा पत्ताच नाही
मनसेच्या म्हणण्यानुसार, शहरातील नालेसफाईचा प्रश्न पावसाळ्यापूर्वीच निकाली निघणे आवश्यक होते. मात्र, पावसाळा सुरू होऊनही नाल्यांची स्वच्छता करण्यात आलेली नाही. याबाबत 15 जुलै 2026 रोजी मुख्याधिकारी, संबंधित अधिकारी तसेच प्रभारी नगराध्यक्ष यांनी मनसे पदाधिकार्‍यांना लेखी आश्वासन देत, सभेत विषयास मंजुरी मिळताच नालेसफाईच्या कामास तातडीने सुरुवात करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

तथापि, शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊनही दि. 3 ऑगस्ट 2026 पर्यंत नालेसफाईचे काम सुरू झालेले नसल्याचा आरोप मनसेने केला आहे त्यामुळे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, या उद्देशाने ‘कचरा फेको’ आंदोलनाचे निवेदन पालिका अधिकारी चावरे यांना देण्यात आले आहे.

भुसावळरांना सहभागाचे आवाहन
मनसे शहराध्यक्ष दीपक सोनवणे यांनी भुसावळकर नागरिकांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले असून, पालिका प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !