भुसावळात स्वसंरक्षण प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना आत्मविश्वासाचा मंत्र
इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीचा उपक्रम ; एन.के.नारखेडे हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण
Self-defense training instills confidence in female students in Bhusawal भुसावळ (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या वतीने स्वसंरक्षण प्रशिक्षण-सुरक्षित ‘उद्यासाठी आजच एक पाऊल’ या उपक्रमांतर्गत शांतीनगर येथील एन.के.नारखेडे हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाची व्यावहारिक माहिती देत आत्मविश्वास, धैर्य आणि सजगतेचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

विद्यार्थिनींना सांगितले स्वसंरक्षणाचे महत्त्व
कार्यक्रमात समुपदेशक आरती चौधरी यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे महत्त्व, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची दक्षता, सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली जागरूकता तसेच विविध स्वसंरक्षण तंत्रांचे सविस्तर मार्गदर्शन केले. अचानक हल्ला झाल्यास स्वतःचे संरक्षण कसे करावे, पकडीतून सुटका करण्याच्या सोप्या पद्धती, तसेच दैनंदिन जीवनात सतर्क राहण्यासाठी आवश्यक सवयी यांचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण त्यांनी दिले.
यावेळी विद्यार्थिनींना संकटाच्या प्रसंगी घाबरून न जाता शांतपणे आणि आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना करण्याचे महत्त्व पटवून सांगण्यात आले. तसेच आपत्कालीन प्रसंगी मदतीसाठी संपर्क साधण्याचे मार्ग, महिला हेल्पलाइन क्रमांकांचा वापर आणि महिलांना उपलब्ध असलेल्या कायदेशीर अधिकारांविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध स्वसंरक्षण तंत्रे प्रत्यक्ष आत्मसात केली. आरती चौधरी यांच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि सजगतेची भावना अधिक दृढ झाल्याचे यावेळी दिसून आले.
कार्यक्रमास इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या अध्यक्षा योगिता वायकोळे, सचिव कविता पाचपांडे तसेच सुनीता पाचपांडे, स्मिता चौधरी, मोना भंगाळे, विनिता नेवे, आरती पाटील आणि कविता हिरोडकर उपस्थित होत्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, शिक्षिका शबनम मंडम तसेच शिक्षकवृंद आणि शाळा प्रशासनाने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थिनींच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणांचे सातत्याने आयोजन होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.