धुळे पोलिसांकडून तब्बल 12.47 कोटींच्या अंमली पदार्थांचा नाश

13 गुन्ह्यांतील 9,536 किलो मुद्देमाल रांजणगाव (पुणे) येथील अधिकृत प्रकल्पात वैज्ञानिक पद्धतीने नष्ट ; ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी


धुळे (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : राज्य शासनाच्या अंमली पदार्थांविरोधातील ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत धुळे जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या 13 गुन्ह्यांतील तब्बल 9 हजार 536 किलो अंमली पदार्थांचा व सुमारे 12 कोटी 47 लाख 30 हजार 450 रुपयांच्या मुद्देमालाचा पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील महाराष्ट्र एन्व्हायरी पॉवर लिमिटेड प्रकल्पात वैज्ञानिक व पर्यावरणपूरक पद्धतीने नाश करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मोहिम
भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या ‘नशामुक्त महाराष्ट्र-2029’ या संकल्पनेअंतर्गत धुळे जिल्हा पोलिसांनी ही महत्त्वपूर्ण कार्यवाही केली. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा हा एक भाग असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

दोन समित्यांमार्फत अंमली पदार्थांचा नाश
या मोहिमेत उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती मार्फत तीन हजार 151 किलो तर प्रादेशिक ड्रग डिस्पोजल समितीमार्फत सहा हजार 385 किलो अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. एकूण नऊ हजार 536 किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. त्यांची एकूण किंमत 12 कोटी 47 लाख 30 हजार 450 रुपये इतकी आहे.

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रक्रिया
अंमली पदार्थ विल्हेवाट प्रक्रियेदरम्यान विशेष पोलीस महानिरीक्षक (अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स) ज्योतीप्रिया सिंह, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण कुमार पाटील (अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स), धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, धुळे अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, धुळे गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक दीपक ढोके आदींची उपस्थिती होती.

यांनी घेतले विशेष परिश्रम
धुळे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सतीश जाधव, हवालदार सुरेश भालेराव, हवालदार शिरीष भदाणे, हवालदार तुषार सूर्यवंशी, कॉन्स्टेबल नितीन दिवसे यांनी याकामी विशेष परिश्रम घेतले.

अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला वेग
धुळे जिल्हा पोलीस अंमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी सातत्याने कठोर कारवाई करत असून अशा कारवायांमुळे जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !