भुसावळात मनसेचे ‘कचरा फेको’ आंदोलन ; नालेसफाई न झाल्यास 15 ऑगस्टनंतर उग्र आंदोलनाचा इशारा


भुसावळ (शुक्रवार, 7 ऑगस्ट 2026) : शहरातील रखडलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत तसेच नगरपालिकेच्या कथित ढिसाळ कारभाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवार, 7 रोजी नगरपालिकेच्या आवारात ‘कचरा फेको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

अर्धा पावसाळा उलटला मात्र नालेसफाईला ‘खो’
मनसेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, पावसाळा सुरू होऊनही भुसावळ शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत नाल्यांची अद्याप प्रभावी साफसफाई करण्यात आलेली नाही. परिणामी अनेक नाले कचर्‍याने तुडुंब भरले असून शहरातील विविध भागांत कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी पाणी साचून घाण पाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरल्याने मोठा त्रास सहन करावा लागला.



भुसावळकर नागरिक नियमितपणे पालिकेचा कर भरत असताना त्यांना मूलभूत नागरी सुविधा मिळण्यासाठी संघर्ष का करावा लागतो? असा सवाल मनसेने उपस्थित केला. प्रभारी नगराध्यक्षा आणि पालिका अधिकार्‍यांनी यापूर्वी लेखी आश्वासन देऊनही नालेसफाईची कामे सुरू न झाल्याचा आरोप करण्यात आला.

तर पालिका अधिकार्‍यांच्या दालनात टाकणार कचरा
मनसेने प्रशासनाला अंतिम इशारा देत सांगितले की, 15 ऑगस्ट 2026 पर्यंत शहरातील नालेसफाईची कामे सुरू न झाल्यास नगरपालिकेतील अधिकार्‍यांच्या दालनात कचरा टाकण्यात येईल. तसेच यापेक्षाही तीव्र व उग्र आंदोलन छेडण्यात येईल. या परिस्थितीस संपूर्णपणे भुसावळ नगरपालिकेचे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात मनसेचे भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक, सुशील मोरे, विलास कोळी, प्रणय भागवत, दशरथ सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !