आगामी वर्षभरात भुसावळकरांना मिळणार ‘अमृत’ चे पाणी : मंत्री संजय सावकारे
राजकीय अडथळ्यानंतर टप्पा दोनच्या जलकुंभाचे भूमिपूजन
भुसावळ (रविवार, 9 ऑगस्ट 2026) :शहरवासीयांचे लक्ष लागून असलेल्या अमृत योजनेतील टप्पा दोनमधील आठवडे बाजार परिसरातील जलकुंभाचे मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते शनिवारी भूमिपूजन करण्यात आले. आगामी वर्षभराच्या आत भुसावळकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी मंत्री सावकारे यांनी दिली. टप्पा एकमधील अपूर्ण कामांना चालना देण्यासह कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
तांत्रिक अडचणी लवकरच मिटणार
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते झालेल्या या भूमिपूजनावेळी त्यांनी वर्षभरात भुसावळकरांना ‘अमृत’ योजनेचे पाणी उपलब्ध होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. विशेष म्हणजे, ‘अमृत-1’ टप्प्यातील कंत्राटदारासोबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींवर नगरपालिका प्रशासन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून सकारात्मक तोडगा काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रखडलेली कामे लवकरच मार्गी लागतील, अशी आशा वर्तवली जात आहे.



सत्तांतरानंतर लागला होता कामांना ‘ब्रेक’
दरम्यान, ‘अमृत-2’ टप्प्यातील कामांना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरुवात झाली होती. या टप्प्यात जलशुद्धीकरण केंद्र, शहरातील उर्वरित पाणीपुरवठा लाईन, नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल तसेच एका जलकुंभाचा समावेश आहे. शहरासाठी एकूण 11 जलकुंभांची योजना असून त्यापैकी 10 जलकुंभ ‘अमृत-1’मध्ये पूर्ण करण्यात येणार होते, तर उर्वरित एक जलकुंभ ‘अमृत-2’मध्ये घेण्यात आला आहे. मात्र नगरपालिकेतील सत्तांतरानंतर या जलकुंभाच्या कामाला काही काळ स्थगिती देण्यात आली होती. प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या कामाला पुन्हा हिरवा कंदील दिला. त्यानंतरच भूमिपूजनाचा मार्ग मोकळा झाला.
19 लाख 55 हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ
प्रभाग क्रमांक 20 मधील आठवडे बाजार परिसरात उभारला जाणारा हा जलकुंभ सुमारे 18 मीटर उंच असून त्याची साठवण क्षमता अंदाजे 19 लाख 55 हजार लिटर इतकी आहे. शहराच्या वाढत्या पाणीगरजांच्या पार्श्वभूमीवर हा जलकुंभ महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगितले जाते.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे, भाजपा गटनेते युवराज लोणारी, पाणीपुरवठा समिती सभापती महिमा नागराणी, शिक्षण समिती सभापती राजेंद्र आवटे, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा इंगळे, आरोग्य समिती सभापती मेघा वाणी, उद्योगपती मनोज बियाणी, सीमा नरवाडे, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, सुजित भोळे, महेंद्रसिंग ठाकूर, किरण कोलते, प्राची पाटील, डॉ.छाया फालक-देशमुख, सोनम इंगळे, विशाल नाटकर, प्रीती पाटील, नितीन धांडे, डॉ.प्रसाद बोंडे, आशिष पटेल, अर्चना सातदिवे, पूजा तायडे, आशा पाटील, निकी बत्रा, भाजपा शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, पुरुषोत्तम नारखेडे, सतीश सपकाळे आदींसह भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.