महिला घरादारासोबत धर्म व संस्कृती सांभाळण्यास समर्थ : भुसावळात रजनी सावकारे
वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात
भुसावळ (रविवार, 9 ऑगस्ट 2026) : राजमाता जिजाऊ ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती ताराराणी ते अंतराळवीर कल्पना चावला यांच्यापर्यंतचा महिलांचा इतिहास हा शौर्य, त्याग आणि संघर्षाचा आहे. आजची महिला घरदार सांभाळून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेच, शिवाय ती आपली धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवण्यास पूर्णपणे समर्थ आहे, असे गौरवद्गार ‘प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी काढले.
ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान संचलित वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत शनिवारी रजनी सावकारे ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी…’ या विषयावर मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.




यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सतीश जंगले, भानुदास पाटील, संजीव चौधरी, संयोजक डॉ.नितु पाटील आदी उपस्थित होते.
बहिणाबाईंच्या कविता या प्रबोधनाचे विद्यापीठ
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात रजनी सावकारे यांनी खान्देशच्या सुकन्या संत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, बहिणाबाई चौधरी यांनी शालेय शिक्षण घेतले असले तरी त्यांच्या ओव्या आणि कविता या मानवी जीवनाचे मर्म सांगणार्या आणि समाज प्रबोधन करणार्या ठरल्या. त्यांच्या याच महान साहित्यामुळे आज जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे, जो संपूर्ण खान्देशसाठी अभिमानाचा विषय आहे. स्त्रीने स्वतःमधील ही उपजत ताकद ओळखून समाजात वावरले पाहिजे.
वासुदेव परिवाराचे उपक्रम स्तुत्य
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने रजनी सावकारे यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीने हॉल गजबजून गेला होता. वासुदेव परिवाराकडून सातत्याने राबवल्या जाणार्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांचे रजनीताईंनी विशेष कौतुक केले.
यावेळी ललिता टोके यांनी स्वरचित स्त्री काळानुसार बदल यावर कविता सादर केली. सोबत प्रकाश पाटील यांनी पण सोशल मीडियावर व्हायरल झालेली कविता सादर केली.
या मासिक सभेला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सन्माननीय सभासद, महिला भगिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सतीश जंगले तर वक्त्यांचा परिचय डॉ.नितु पाटील तसेच आभार संजीव चौधरी यांनी मानले.