शिक्षक आपल्या दारी ! विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी भुसावळातील म्युनिसिपल हायस्कूलचा अनोखा उपक्रम
पालकांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत पाठवावे : मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने
भुसावळ (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्यांची शाळेतील उपस्थिती वाढावी आणि गुणवत्ता वृद्धिंगत व्हावी, यासाठी नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी एक अनोखा उपक्रम राबविला. ‘शिक्षण आपल्या दारी’ या संकल्पनेतून शाळेतील शिक्षकांनी भानखेळा व तिघरा या गावांतील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांच्या भेटी घेतल्या.
या गावांमधील अनेक पालकांचा उदरनिर्वाह हातमजुरीवर अवलंबून आहे. गावातून भुसावळ येथील शाळेत पालकांना ये-जा करण्यासाठी सुमारे 50 रुपये खर्च होतो, तसेच त्यांचा एक दिवसाचा रोजगारही बुडतो. त्यामुळे पालकांना शाळेत आयोजित करण्यात येणार्या बैठकींना उपस्थित राहणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन शाळेच्या वतीने गावातील प्राथमिक शाळेतच पालक-शिक्षक सभा आयोजित करण्यात आली.




या सभेत डॉ. प्रदीप साखरे यांनी पालकांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांनी दररोज नियमित शाळेत उपस्थित राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे पटवून दिले. विद्यार्थ्यांची शाळेत नियमित उपस्थिती राहिल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल आणि गुणवत्तेत निश्चितच सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच पालकांनी आपल्या पाल्याने शाळेत दिलेला गृहपाठ व अभ्यास पूर्ण केला आहे की नाही, याची दररोज विचारपूस करावी, विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि त्यांना नियमितपणे शाळेत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांप्रमाणेच पालकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षक पालक संघाचे सचिव नाना पाटील यांनी शिक्षक पालक संघाविषयी माहिती पालकांना दिली.
शाळेचे मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी पालकांना आगामी परीक्षेबाबत आवश्यक माहिती दिली. तसेच शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्या विविध शैक्षणिक व कल्याणकारी योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमात रेखा सोनवणे, ज्योती शिरतुरे, संध्या धांडे, पुनम देवकर, एस. टी. चौधरी, डी. के. भंगाळे, एन. एच. राठोड, नाना पाटील, लक्ष्मण पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन पालकांशी संवाद साधत ‘आपला पाल्य नियमित शाळेत पाठवा, त्याच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि त्याच्या गुणवत्तावाढीसाठी शाळेला सहकार्य करा’, असे आवाहन केले.
शाळा विद्यार्थ्यांच्या दारी आणि शिक्षण पालकांच्या दारी पोहोचविणार्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.