थोरगव्हाणच्या डी.एस.देशमुख विद्यालयात ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ उत्साहात
थोरगव्हाण, ता.रावेर (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ अंतर्गत भारत सरकारसोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार तसेच मेडिकल विंग (राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन) यांच्या सहकार्याने 6 ते 20 ऑगस्ट 2026 या कालावधीत देशभर ‘नशामुक्ती प्रतिज्ञा पंधरवडा’ उद्घाटन 8 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले
पंधरवड्यात विविध कार्यक्रम होत असून या उपक्रमाचा उद्देश विशेषतः युवक, युवती व विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करून व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे हा आहे. या अभियानांतर्गत व्यसनाला नाही म्हणा, जीवनाला हो म्हणा हा संदेश देण्यात येत आहे.




या उपक्रमाच्या अनुषंगाने दि एज्युकेशन सोसायटी (स्थापना 1917), थोरगव्हाण संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे विद्यार्थ्यांसाठी नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा सुमारे 400 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
व्यसनांपासून दूर रहा
यावेळी नशामुक्ती मंडळाचे जिल्हा संघटक दयाघन राणे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या व्यसनांचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. व्यसनांपासून स्वतः दूर राहण्याबरोबरच कुटुंब, मित्रपरिवार व समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी ‘व्यसनांना नाही म्हणा व जीवनाला हो म्हणा’ या संदेशाची प्रबोधनात्मक प्रतिज्ञा ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांकडून सामूहिकरीत्या वदवून घेतली. या सामूहिक प्रतिज्ञेमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत झाली.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, संचालक मधुकर कोल्हे, ज्येष्ठ सदस्य रवींद्र चौधरी, मुख्याध्यापक डी.के.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक नंदकुमार चौधरी होते.
नंदकुमार चौधरी यांनी नशा है तो मौत है, नशा नहीं है तो जीवन की आशा है, असा संदेश देत विद्यार्थ्यांनी व्यसनांसारख्या वाईट गोष्टींचे अनुकरण करू नये, असे आवाहन केले. कुटुंब, शेजारी व नातेवाईकांमध्ये तंबाखूमुक्तीची जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, आई-वडील मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मोठे कष्ट घेत असतात. मात्र वाईट संगतीमुळे विद्यार्थी व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व प्रबोधन मिळण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.
मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जनार्दन चौधरी, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने अभिनंदन केले. सूत्रसंचालन एस.बी.सपकाळे यांनी केले, तर एम. के. पाटील यांनी आभार मानले.
ज्येष्ठ शिक्षक वाय.जे.कुरकुरे, जयश्री चौधरी, एस.बी.सपकाळे, एम.के. पाटील, के. एम. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. सुमारे 400 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला.