भुसावळातील सिंधी कॉलनीत विजेचा ‘लोड’ वाढताच 30 कुटुंबांतील उपकरणे जळाली
फ्रिज, टीव्ही, इन्व्हर्टर, दिवे निकामी ; लाखो रुपयांचे नुकसान
भुसावळ (मंगळवार, 11 ऑगस्ट 2026) : शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गेल्या पंधरवड्यापासून विजेचा लोड वाढत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वीजपुरवठ्यात वारंवार होणार्या चढ-उतारामुळे परिसरातील सुमारे 30 कुटुंबांमधील फ्रिज, टीव्ही, इन्व्हर्टर, दिवे यासह विविध विद्युत उपकरणे जळून निकामी झाली आहेत. या घटनेत नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही वीज कंपनीच्या अधिकार्यांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वीजपुरसठा सुरळीत नसल्याच्या तक्रारी
सिंधी कॉलनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अचानक वीजेचा लोड वाढणे, त्यानंतर पुरवठा खंडित होणे तसेच पुन्हा वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर विद्युत उपकरणांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे घरातील महागडी उपकरणे जळून निकामी होत असल्याने रहिवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.




महागडी उपकरणे जळून खाक
विजेच्या चढ-उताराचा फटका अनेक कुटुंबांना बसला आहे. फ्रिज, टीव्ही, इन्व्हर्टर, दिवे यासह विजेवर चालणारी विविध उपकरणे जळाल्याने नागरिकांना दुरुस्ती अथवा नवीन उपकरणे खरेदी करण्याचा खर्च करावा लागत आहे. सुनील बठेजा, गोपाळ कमनानी, नरेश चावला यांच्यासह अनेक रहिवाशांच्या घरातील उपकरणांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
गेल्या पंधरवड्यापासून हा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घरातील एखादे उपकरण जळणे ही बाब एकवेळची असू शकते; मात्र परिसरातील अनेक घरांमध्ये एकाच पद्धतीने नुकसान होत असल्याने वीजपुरवठ्याच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
तक्रारी करूनही दुर्लक्ष?
परिसरातील नागरिकांनी वीज कंपनीच्या संबंधित अधिकार्यांकडे या समस्येबाबत तक्रारी केल्या आहेत मात्र अद्याप समस्या कायम असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. वीजपुरवठ्यातील चढ-उताराचे नेमके कारण शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.