भुसावळात अखंड भारताचे शिल्पकार सरदार वल्ललभाई पटेल यांच्या कार्याचा नाटिकेतून जागर
प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे संतोषी माता सभागृहात जीवनचरित्राचे प्रभावी सादरीकरण
भुसावळ (सोमवार, 17 ऑगस्ट 2026) : देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रहितासाठी आयुष्य समर्पित करणारे भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनकार्याला भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाटीकेतून उजाळा देण्यात आला. प्रोफेसर कॉलनीतील संतोषी माता सभागृहात रविवार, 16 रोजी सायंकाळी सरदार पटेल यांच्या जीवनचरित्रावर आधारित नाटीका सादर करण्यात आली. कलाकारांच्या प्रभावी अभिनयातून त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासासह देशहितासाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याचे दर्शन उपस्थितांना घडले.
ऐतिहासीक कार्याला मिळाला उजाळा
सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली भूमिका, देशाच्या एकतेसाठी घेतलेले कठोर निर्णय आणि स्वातंत्र्यानंतर विविध संस्थानांचे भारतात विलीनीकरण करून अखंड भारताच्या निर्मितीसाठी केलेले ऐतिहासिक कार्य नाटिकेतून प्रभावीपणे मांडण्यात आले. नाटीकेतून सरदार पटेल यांच्या सार्वजनिक जीवनातील विविध टप्प्यांवर विशेष प्रकाश टाकण्यात आला. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान, देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री म्हणून त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांना आलेल्या विविध अडचणी यांचे भावपूर्ण सजीव चित्रण सादर करण्यात आले.
देशाच्या एकीकरणासाठी केलेल्या प्रसंगाने मिळवली दाद
देशाची एकता आणि अखंडता टिकविण्यासाठी सरदार पटेल यांनी घेतलेल्या ठाम भूमिकेचा तसेच त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाचा गौरवही नाटिकेतून करण्यात आला. अनेक आव्हानांना सामोरे जात त्यांनी देशाच्या एकीकरणासाठी केलेले प्रयत्न हा प्रसंग विशेष प्रभावी ठरला.
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या या उपक्रमातून नव्या पिढीला सरदार पटेल यांच्या विचारांची, राष्ट्रनिष्ठेची आणि देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देणार्या कार्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाटिकेच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशभक्तीवर गाण्यांचे सादरीकरण
कार्यक्रमाच्या सुरूवातीला युफोरिया भुसावळ टीमने देशभक्तीवर गाण्यांचे सादरीकरण केले. या गीतांनाही उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास महामंडलेश्वर जनार्दन महाराज, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, डीवायएसपी केदार बारबोले, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, शहर निरीक्षक महेश गायकवाड, महिला समुपदेशक आरती चौधरी, डॉ.संगीता बियाणी, उद्योजक मनोज बियाणी, भुसावळ बाजार समिती सभापती अनिल वारके, नगरसेविका, नगरसेवक, विविध संस्थेचे अध्यक्ष आदींची प्रमुख उपस्थिती होती.
तरुणाईला कळाला गौरवशाली इतिहास : महामंडलेश्वर
महामंडलेश्वर जनार्दन महाराज आशीर्वचनात म्हणाले की, आजच्या तरुणाईला आपला प्राचीन इतिहास ठावूक नाही मात्र प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षी आयोजित कार्यक्रमातून आजच्या पिढीला आपला गौरवशाली इतिहास कळतो. आपल्या आजच्या व भावी पिढीला महान पुरूष व स्वातंत्र्य सेनानी कळले पाहिजे व हा गौरवशाली इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे स्तुत्य कार्य भुसावळातील प्रतिष्ठा मंडळाने अविरतपणे सुरू ठेवल्याने या मंडळाचे कौतुक करावे तितके कमीच आहे. मंत्री संजय सावकारे हे राजकारणी असलेतरी त्यांचे अशा सामाजिक उपक्रमांना नेहमीच सहकार्य असते. शहरातील विविध मंडळे असो की सामाजिक संस्था मंत्र्यांचे नेहमीच या कार्यक्रमांसाठी भरीव योगदान निश्चितच इतरांना प्रेरणादायी आहे.
भुसावळ ही तर कलावंतांची खाण : मंत्री सावकारे
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे म्हणाले की, आजच्या पिढीला आपला खरा इतिहास कळायलाच हवा. स्वातंत्र्यासाठी महान पुरूषांनी प्रचंड खस्ता खाल्ल्या, प्रसंगी अपमान सहन केला व त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंड भारताच्या निर्मितीसाठी कणखर भूमिका घेतले नसलेतरी भारताची परिस्थिती वेगळी असती, असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले. भुसावळातील प्रतिष्ठा मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमातून थोर पुरूषांच्या कार्याला उजाळा दिला जातो ही बाब तरुणाईसाठी निश्चितपणे प्रेरणादायी आहे. भुसावळ ही तर कलावंतांची खाण असून या शहरातील स्थानिक कलावंतांना नाटकाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाते शिवाय कोरीओग्राफी, आवाज व्यवस्थाही स्थानिकांनी उत्कृष्ट पद्धत्तीने केल्याचा गौरव त्यांनी केला. कार्यक्रमाच्या अंती मंत्री सावकारे यांनी देशभक्तीवर आधारित गाणे गाताच हॉलमधील नागरिक तालावर थिरकले.
कलावंतांना व्यासपीठ, स्थानिकांना रोजगार : रजनी सावकारे
प्रास्ताविकात प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी मंडळाच्या उपक्रमाचा उद्देश सांगितला. देशातील थोर पुरूषांचा इतिहास आजच्या पिढीला कळावा या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, नाटीकेच्या माध्यमातून स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळते शिवाय कोरीओग्राफी, कॉश्यूम व विविध साहित्याच्या आवश्यकतेमुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतो. इतिहासाला उजाळा देण्याचे काम अविरतपणे सुरू राहील, असेही रजनी सावकारे यांनी सांगितले.
मंडळाचा उपक्रम स्तुत्य : डीवायएसपी
डीवायएसपी केदार बारबोले यांनी सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारीत नाटीकेचे अतिशय उत्तम पद्धत्तीने सादरीकरण करण्यात आल्याचे नमूद करीत सामाजिक उपक्रमात मंडळ अग्रेसर असल्याचे सांगितले.
यांनी वठवल्या भूमिका
सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका डॉ.मकरंद चांदवडकर तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका डॉ.समीर चौधरी यांनी वठवली. सुधीर तायडे यांनी वी.पी.मेनन, सागर पाटील, आकाश शेंडे यांनी नवाब यांची भूमिका साकारली. नाटकातील संवादाचे सादरीकरण संजय चांडक यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
