भालोद कला व विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यक्रम


भालोद, ता.यावल (मंगळवार, 18 ऑगस्ट 2026) : गावातील कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने सर्प संवर्धन व जनजागृती कार्यशाळा झाली. प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.अजय कोल्हे यांनी केले. त्यांनी निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्प संवर्धन व त्याविषयी समाजात जनजागृती करणे ही काळाची गरज आहे सर्प हे शेतकर्‍यांचे मित्र असून सर्प संवर्धन हे अन्नसाखळीमध्ये महत्त्वाचे आहेत असे प्रतिपादन केले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा.डॉ.किशोर कोल्हे, मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.जतीन मेढे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.वसंत पवार महाविद्यालयातील आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

सर्प हा तर शेतकर्‍यांचा मित्र
प्रा.चंद्रकांत वानखेडे यांनी सर्पाच्या विषारी आणि बिनविषारी प्रजाती विषयी माहिती देऊन सर्पदौल झाल्यास कुठले वैद्यकीय उपचार घ्यावे याबद्दल माहिती दिली. सर्प हा शेतकर्‍यांचा कसा मित्र आहे याचे महत्त्व देखील पटवून सांगितले. त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना भारतात प्रामुख्याने धामण, अजगर, मांडूळ, गवत्या, हरणटोड आणि पाणसाप हे प्रमुख बिनविषारी साप आढळतात त्यांच्या चावण्याने माणसाचा मृत्यू होत नाही कारण त्यांच्यामध्ये विषारी ग्रंथी नसतात हे साप शेतातील उंदीर व किडे खाऊन शेतीचे रक्षण करतात. भारतात आढळणारे किंग कोब्रा, इंडियन क्रेट रसेल वायपर, करवतीच्या खवल्यांचा विषारी साप, भारतीय नाग, मलबार पिट वायपर, पट्टेरी मण्यार, बांबू पिट वायपर इत्यादी विषारी सापांचे छायाचित्र दाखवून मार्गदर्शन केले नाग, मण्यार, घोणस, फुरसे हे चार अत्यंत विषारी साप कसे ओळखावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. सापाबद्दल असलेले गैरसमज व अंधश्रध्दा संपवणे आवश्यक आहे याचे त्यांनी प्रतिपादन केले.

सर्पाच्या विषापासून अँटीव्हिनेम लस
अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य किशोर कोल्हे यांनी सर्पच्या विषापासून सर्प दंशावर उपचार करणारे अँटीव्हिनेम लस तयार केली जाते याचे प्रतिपादन केले व विद्यार्थ्यांनी साप दिसल्यास न मारता स्थानिक सर्पमित्रांना फोन करून सुरक्षितपणे पकडून जंगलात सोडावे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्प संवर्धन व त्याविषयीची जनजागृती समाजामध्ये करावी असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !