भुसावळात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरात 120 रुग्णांची तपासणी

रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा उपक्रम : 40 जण शस्त्रक्रियेसाठी पात्र


भुसावळ (गुरुवार, 20 ऑगस्ट 2026) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयुध निर्माणी वरणगाव मुख्य हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे 120 रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली व 40 रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.

20 रुग्णांवर जळगावात शस्त्रक्रिया
पात्र रुग्णांपैकी 20 रुग्णांना गुरुवार, 20 ऑगस्ट रोजी मोफत शस्त्रक्रियेसाठी जळगावातील कांताई नेत्रालयात रवाना करण्यात आले. उर्वरित 20 रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया रविवार, 23 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे.

या प्रकल्पांतर्गत पात्र रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, लेन्स प्रत्यारोपण व आवश्यक औषधोपचार करण्यात येणार आहेत. रुग्णांच्या राहण्याचा व जेवणाचा खर्चही रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व कांताई नेत्रालय यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचे प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन मनोज सोनार यांनी सर्व तांत्रिक बाबींचे योग्य नियोजन करून त्या यशस्वीरीत्या हाताळल्या. तर को-प्रोजेक्ट चेअरमन रोटेरियन गणेश तिवारी यांनी ग्रामीण भागातील रुग्णांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्याशी प्रभावी समन्वय साधला. रुग्णांची नोंदणी, तपासणी, शस्त्रक्रियेसाठी निवड व पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्याच्या प्रक्रियेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला.

प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आयुध निर्माण कारखाना वरणगावचे मुख्य महाव्यवस्थापक एम.झेड.सरवर व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांचे विशेष सहकार्य लाभले. रोटेरियन विकास पाचपांडे, विशाल शाह, सचिन अग्रवाल, डॉ.विद्याधर भोळे, डॉ.प्रशांत जाधव, तेजस नवगाळे, संदीप जोशी व श्रीकांत जोशी यांनी उपस्थित राहून सेवा दिली. या शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मोफत उपचार व दृष्टीचा नवा प्रकाश मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !