रक्षाबंधनाच्या राख्यांवर सायबर सुरक्षेचा संदेश : 50 राख्यांतून जनजागृती
जळगाव (शनिवार, 29 ऑगस्ट 2026) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने पारंपरिक सणाला सायबर सुरक्षेची जोड देत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, क्विक हिल फाउंडेशन व क्यूएसएफ वरीयर्स क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखा सायबर जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतः 50 डीआयवाय राख्या तयार केल्या. या राख्यांवर विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण सायबर सेप्टी टीप्स लहिण्यात आल्या. नागरिकांना सायबर फसवणुकीपासून संरक्षणासाठी उपयुक्त अॅन्टी फ्रॉड अॅपचा क्यूआर कोड राख्यांवर देण्यात आला.
ज्वेलर्स बंधूंना बांधल्या राखल्या
जळगाव वाहतूक पोलीस तसेच ज्वेलर्सना बांधण्यात आल्या. राखी बांधताना विद्यार्थ्यांनी संबंधितांना ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत माहिती दिली. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, युपीआय पीन, पासवर्ड किंवा बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच अनोळखी कॉल व संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

रक्षाबंधनाच्या माध्यमातून ‘रक्षण’ या संकल्पनेला डिजिटल सुरक्षेची जोड देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांच्या माध्यमातून सायबर सुरक्षेचा संदेश नागरिकांपर्यंत सहज आणि प्रभावी पद्धतीने पोहोचविण्यात आला.
आजच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार, संवाद आणि दैनंदिन जीवनातील अनेक बाबी ऑनलाइन झाल्याने सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने जागरूक असणे गरजेचे आहे. याच उद्देशाने नात्यांचे रक्षण करण्यासोबतच आपल्या डिजिटल आयुष्याचेही रक्षण करूया हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
परंपरा, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि सायबर जागरूकता यांचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम सायबर सुरक्षिततेचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक अभिनव पाऊल ठरला.
