भुसावळात पथदिवे, हायमास्ट दुरुस्ती बंद कारण 15 महिन्यांपासून ठेकेदाराला बिल दिलेच नाही

सण-उत्सवाच्या काळातच 650 पेक्षा अधिक दिवे बंद : दहा दिवसांपासून ठेकेदाराने कामाकडे फिरवली पाठ


भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : नाशिक विभागातील एकमेव ‘अ’वर्ग पालिकेतील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती करणार्‍या ठेकेदाराला तब्बल 15 महिन्यांपासून बिल अदा न करण्यात आल्याने संबंधितांनी दहा दिवसांपासून कामाकडे पाठ फिरवली आहे. शहरातील तब्बल 650 हून अधिक पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बिल थकल्याने ठेकेदाराचे पाऊल
भुसावळात सण-उत्सवांच्या काळातच शहरातील सेंट्रल पोल, अंतर्गत पथदिवे, मिनी हायमास्ट दिव्यांच्या देखभाल दुरुस्ती व साहित्याचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराने दहा दिवसांपासून काम बंद केले आहे. यामुळे शहरातील तब्बल 650 पेक्षा अधिक पथदिवे बंद झाले आहेत. गेल्या 15 महिन्यांपासून पालिकेने ठेकेदाराचे बिल थकवल्याने संतप्त ठेकेदाराने अखेर शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती पूर्णपणे बंद केली आहे. गेल्या दहा दिवसांपासून दुरुस्तीचे काम ठप्प झाल्यामुळे अनेक भागांमध्ये रात्रीच्या वेळी प्रचंड अंधार पसरल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


आर्थिक अडचण वाढल्याने निर्णय
शहरातील सेंट्रल पोल, अंतर्गत भागातील छोटे आणि मोठे हायमास्ट दिवे दुरुस्त करण्याचे कंत्राट ठेकेदाराकडे आहे मात्र गेल्या सव्वा वर्षापासून या कामाचे बिल पालिकेने अदा केलेले नाही. बिल रखडल्यामुळे ठेकेदाराची आर्थिक अडचण वाढली आहे. नवीन साहित्याचा पुरवठा करणे आणि कर्मचार्‍यांचे पगार देणे ठेकेदाराला अशक्य झाल्याने, 10 दिवसांपूर्वी दुरुस्तीचे काम बंद केले. शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद आहेत. या गंभीर समस्येबाबत नागरिकांनी आणि संबंधित घटकांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या.

सत्ताधार्‍यांबद्दल वाढतोय रोष
आगामी काळात गणेशोत्सव आहे. या काळात भाविक रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर असतात. याच काळात रस्त्यांवर अंधार कायम राहिला तर छेडखानी, चोरी आदी प्रकार घडू शकतात. यामुळे प्रशासन व सत्ताधार्‍यांबद्दल रोष वाढू शकेल. पालिकेने पथदिवे सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे.

अंधाराने गैर प्रकाराची वाढली भीती
अंतर्गत गल्ल्यांमध्ये अंधार असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून चोरीच्या घटनांची भीतीही वाढली आहे. पथदिवे सुरू करण्यासाठी पालिकेकडे तक्रारी करत आहेत मात्र कंत्राटदार कामावर नसल्याने दररोजच्या 125 ते 130 तक्रारी प्रलंबित आहे. पालिका प्रशासन आता तरी यावर तातडीने तोडगा काढून ठेकेदाराचे बिल देणार की शहर असेच अंधारात राहणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !