भुसावळ विभागातील रेल्वे प्रकल्पांचा रेल्वे बोर्ड सदस्यांनी घेतला आढावा
भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : रेल्वे बोर्डाचे सदस्य (अवसंरचना) विवेक कुमार गुप्ता यांनी शनिवार 29 रोजी भुसावळ विभागाची पाहणी करून विभागात सुरू असलेल्या प्रमुख रेल्वे प्रकल्प, पायाभूत सुविधा विकासकामे तसेच परिचालनाशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला.
डीआरएम कार्यालयात आढावा बैठक
भुसावळ विभागीय कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस विभागीय रेल्वे व्यवस्थापक, श्री. पुनीत अग्रवाल यांच्यासह विभागातील सर्व विभागांचे वरिष्ठ शाखाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान विभागात सुरू असलेल्या तसेच प्रस्तावित प्रमुख रेल्वे प्रकल्पांची प्रगती, पायाभूत सुविधांशी संबंधित कामे आणि प्रकल्पांची वेळेत अंमलबजावणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश
रेल्वे बोर्डाचे सदस्य (अवसंरचना) विवेक कुमार गुप्ता यांनी विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती घेत संबंधित अधिकार्यांना निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे, कामांचा दर्जा व गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणार्या अडचणींचे संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले.
आढावा बैठकीनंतर रेल्वे बोर्डाचे सदस्य (अवसंरचना) यांनी भुसावळ रेल्वे स्थानकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानकावरील उपलब्ध प्रवासी सुविधा, फलाट, सर्क्युलेटिंग एरिया तसेच इतर पायाभूत सुविधांची पाहणी केली. स्थानकाचा सर्वांगीण विकास आणि भविष्यातील प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने पुढे नेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बांधकामांची केली पाहणी
रेल्वे बोर्डाचे सदस्य (अवसंरचना) यांनी भुसावळ ते नाशिक रोड दरम्यान विंडो ट्रॉलिंगद्वारे रेल्वे मार्गाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान रेल्वे मार्ग, पायाभूत सुविधा, स्थानक परिसर तसेच मार्गावर सुरू असलेल्या विविध विकास व बांधकाम कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. यावेळी विभागातील वरिष्ठ अधिकार्यांनी सदस्य (अवसंरचना) यांना विभागात सुरू असलेल्या विविध प्रमुख प्रकल्पांची तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. कुंभमेळ्यासाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांची त्यांनी प्रशंसा केली तसेच सर्व प्रकल्प निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर दिला.
