भुसावळातील सामान्य कुटुंबातील योगिता भराडे यांची न्यायाधीश पदाला गवसणी

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर महाराष्ट्रात 14 वा क्रमांक ; दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम वर्गपदी नियुक्ती


भुसावळ (शनिवार, 19 सप्टेंबर 2026) : शहरातील मूळ रहिवासी व जळगावस्थित योगिता भराडे (अग्रवाल) यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन 2023 मध्ये झालेल्या ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी वर्ग-1’ या परीक्षेत त्यांनी महाराष्ट्रात 14 वा क्रमांक मिळवत न्यायाधीश होण्याचे स्वप्न साकार केले.

मूळच्या भुसावळच्या रहिवासी
योगिता या भुसावळातील नामांकित उद्योजक कै.भंवरलाल भराडे यांच्या प्रेरणेने आणि आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या ध्येयाने शिक्षणाच्या वाटेवर पुढे गेल्या. अहिल्यादेवी कन्या विद्यालयातून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षणासोबतच कुटुंबाची जबाबदारीही सांभाळली. शिकवणीतून उत्पन्न मिळवत त्यांनी पुढील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. सन 2015 मध्ये मुळजी जेठा महाविद्यालयातून संस्कृत विषयातील विशेष प्रावीण्यासह कला शाखेची पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर सन 2018 मध्ये एस.एस.मणियार महाविद्यालयातून विधी शाखेची पदवी संपादन केली. पुढे जळगाव येथील सुप्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅड.आर.डी.परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी न्यायालयीन कामकाजात वकिलीची सुरुवात केली.

पतीची मोलाची साथ
विवाहानंतरही योगिता यांनी आपल्या ध्येयापासून माघार घेतली नाही. घरातील जबाबदार्‍या, वकिलीचे काम आणि न्यायालयीन कामकाज सांभाळत त्यांनी पुढील अभ्यास सुरू ठेवला. त्यांच्या या कठीण प्रवासात ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.आर.डी.परांजपे, पुण्यातील नामांकित शिक्षणतज्ज्ञ तसेच महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य गणेश शिरसाट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पती हनीश अग्रवाल यांचीही त्यांना खंबीर साथ मिळाली.

न्याय दंडाधिकारी म्हणून नियुक्ती
अथक परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर योगिता यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सन 2023च्या परीक्षेत महाराष्ट्रात 14 वा क्रमांक मिळविला. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामार्फत वाशिम येथील न्यायालयात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. योगिता यांच्या या यशाने त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या एका मुलीने घरातील जबाबदार्‍या सांभाळत न्यायालयीन क्षेत्रात मिळविलेले हे यश अनेक मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

आजच्या पिढीनेही ध्यावा आदर्श
इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणत्याही परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते, याचे जागृत उदाहरण योगिता भराडे यांच्या यशातून समाजासमोर आले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीतून पुढील पिढीनेही ध्येय निश्चित करून कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !