भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षा दलाची धडक कारवाई : तिकीट दलाली, चोरीच्या मोबाईलसह चार प्रकरणांत उल्लेखनीय कामगिरी
भुसावळ (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) विविध ठिकाणी विशेष मोहीम राबवत तिकीट दलाली, चोरीचा मोबाईल, प्रवाशांचे हरवलेले सामान तसेच अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेबाबत प्रभावी कारवाई केली. ‘ऑपरेशन उपलब्ध’, ‘ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी’, ‘ऑपरेशन अमानत’ आणि ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
रावेरमध्ये तिकीट दलालीवर कारवाई
भुसावळ यार्ड पोस्टच्या पथकाने रावेरातील पीआरएस केंद्रात रेल्वे तिकीटांची दलाली करताना मोहम्मद अशरफ शेख मुजाहिद यास पकडले. संशयीताकडून एक रेल्वे तिकीट व एक ब्लँक रिझर्वेशन फॉर्म जप्त करण्यात आला. या प्रकरणी रेल्वे कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.
मलकापूरमध्ये चोरीच्या मोबाईलसह संशयित ताब्यात
मलकापूर पोस्टच्या पथकाने ‘ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी’ अंतर्गत तपासणी करताना आदिल शाह हारून शाह यास ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडून सुमारे 18 हजार रुपये किंमतीचा व्हीवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला. चौकशीत त्याने यापूर्वी मोबाईल चोरीच्या घटनेत सहभाग असल्याचे सांगितल्याची माहिती देण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मुर्तिजापूरमध्ये प्रवाशाची बॅग सुरक्षित परत
‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत मुर्तिजापूर पोस्टच्या पथकाने ट्रेन क्रमांक 12105 मध्ये प्रवाशाची विसरलेली ट्रॉली बॅग सुरक्षितपणे शोधून काढली. आवश्यक पडताळणी केल्यानंतर ही बॅग प्रवासी गौरव महादेव बडोकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. बॅगेतील सामानाची अंदाजे किंमत 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
अकोल्यात दोन अल्पवयीन मुलांना सुरक्षित ताब्यात
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत अकोला पोस्टच्या पथकाने ट्रेन क्रमांक 17641 च्या स्लीपर कोचमधून दोन अल्पवयीन मुलांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. त्यानंतर रेल्वे चाईल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून दोन्ही मुलांना बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी), अकोला यांच्यासमोर सादर करण्यात आले. समितीच्या आदेशानुसार त्यांना शासकीय बालगृह, अकोला येथे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
या विविध कारवायांमुळे भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाकडून प्रवाशांची सुरक्षा, रेल्वे तिकीट दलालीविरोधातील कारवाई, हरवलेल्या वस्तूंची परतफेड आणि बालसुरक्षा या क्षेत्रात सातत्याने काम केले जात असल्याचे दिसून येते.




