रावेर तालुका खुनाने हादरला : घरगड्याने वयोवृद्धेचा सोन्याच्या दागिण्यांसाठी केला खून
रावेर (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : घरात काम करणार्या सालदारानेच 72 वर्षीय वयोवृद्धेचा सोन्याच्या दागिण्यांसाठी खून केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील दोधा गावात बुधवारी घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली. ललिताबाई वसंत पाटील (72, रा.दोधा, ता.रावेर) असे खून झालेल्या महिलेचे तर लाला धर्मा भिलाला (19, रा.प्रकाश पाटील यांचा वाडा, दोधा, ता.रावेर, मूळ गाव नसिराबाद बोरी, ता.नेपानगर, बुर्हाणपूर) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
सोन्याच्या दागिण्यांसाठी वृद्धेचा खून
सूत्रानुसार संशयीत लाला धर्मा भिलालाही पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली असून ती संशयीत आरोपीकडे सतत 30 हजार रुपये दे तरच नांदायला येईल नाहीतर दुसरे लग्न करेल, असे त्याला धमकावत होती मात्र परिस्थितीने बेजार असलेल्या लालाकडे पैसे नसल्याने त्याने घर मालकाकडेच चोरीची योजना आखली.
बुधवारी दुपारी घरातील सदस्य भंडार्याला गेल्यानंतर घरात केवळ ललिताबाई एकट्या असल्याची त्याने संधी साधत दुपारी दिड वाजेच्या सुमारास घरामागील बाजूने प्रवेश करीत स्वतःच्याच बेल्टने वृद्धेचा गळा आवळला. वृद्धा मयत होताच तिच्या गळ्यातील हार, कानातले असे काढून तो बाहेर पडला. विशेष म्हणजे वृद्धेच्या खुनानंतरही संशयीताचा वावर सर्वसामान्यांप्रमाणे राहिला मात्र पोलिसांना आलेल्या संशयीतानंतर त्याची खोलवर विचारपूस केल्यानंतर त्याने खुनाची कबुली देत गळ्यातील हार आणि कानातले लपवलेले सोन्याचे दागिने काढून दिले. रावेर निरीक्षक संदीप पाटील व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत अवघ्या काही वेळेत खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला बेड्याही ठोकल्या.




