धरणगावातील चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस : यावल तालुक्यातील आरोपीला अटक
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : साडेसात लाखांचे वाहन जप्त
जळगाव (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : धरणगाव शहरातील सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला पार्क केलेले फोर्स कंपनीचे सिल्वर रंगाचे क्रुझर चारचाकी वाहन चोरीला गेले होते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करीत यावल तालुक्यातील आडगावातील आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून साडेसात लाख रुपये किंमतीचे चोरीचे वाहन जप्त करण्यात आले. रुपेश अशोक मराठे (25, आडगाव, ता.यावल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे चोरी प्रकरण
मंगळवार, 29 सप्टेंबर 2026 रोजी रावसाहेब नगराज देवरे यांच्या मालकिची क्रुझर (क्रमांक एम.एच.19 व्ही.4440) ही सकाळी 10 ते दुपारी चार वाजेच्या दरम्यान धरणगाव शहरातील सोनवद रोडवरील हनुमान मंदिराजवळून चोरीला गेली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत रुपेश अशोक मराठे (वय 25, रा. आडगाव, ता. यावल, जि. जळगाव) यास अडावद-धानोरा परिसरातून वाहनासह ताब्यात घेण्यात आले. आरोपीला धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सहा.निरीक्षक प्रशांत कंडारे, उपनिरीक्षक संतोष पवार, हवालदार विष्णू बिर्हाडे, हवालदार दीपक माळी, हवालदार रवींद्र पाटील, हवालदार जितेंद्र चव्हाण, हवालदार समाधान भागवत, हवालदार जयदीप राजपूत, कॉन्स्टेबल सुमित बाविस्कर, कॉन्स्टेबल किशोर भोई, कॉन्स्टेबल विजय खैरनार आदींच्या पथकाने केली.
