20 हजारांची लाच मागणी भोवली : भुसावळ तालुका पोलिस ठाण्यातील हवालदार निलंबित


गणेश वाघ
भुसावळ (बुधवार, 30 सप्टेंबर 2026) : गुन्ह्यात कारवाई न करण्याच्या मोबदल्यात खाजगी पंटराच्या माध्यमातून 20 हजारांच्या लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून भुसावळ तालुका पोलिसात कार्यरत हवालदार महेश एकनाथ चौधरी यांना जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबतचे आदेश बुधवार, 30 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आले आहेत.

लाच प्रकरणी पंटर कोठडीत
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौघांवरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी एक लाखांची लाच मागून सुरूवातीला 50 हजार रुपये स्वीकारणार्‍या व नंतर 50 हजारांची लाच मागून 20 हजारात तडजोड करणारा खाजगी पंटर अमन जसबिंदर सनसोये (36, दीपनगर) यास मंगळवारी जळगाव एसीबीने अटक केली होती. अटकेतील आरोपीला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

संशय आल्याने टळला सापळा
एसीबीने 3 ऑगस्ट 2026 रोजी सापळा रचल्यानंतर तक्रारदार लाच रक्कम घेवून दीपनगर पोलीस चौकीत पोहोचले मात्र यावेळी हवालदार महेश चौधरी यांनी काहीही संवाद साधला नाही तर थोड्या वेळाने संशयीत अमन सनसोये याने तक्रारदाराला फोन करून प्रकरणाबाबत चर्चा केली तसेच दीपनगर गेट क्रमांक 500 वर भेटण्यास बोलावले. यावेळी तक्रारदाराकडून संशयीताने 35 हजार रुपये घेतल्याचे मान्य करीत हवालदार महेश चौधरी यांच्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी अमन सनसोये यास अटक करण्यात आल्यानंतर भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपीच्या चौकशीनंतर एसीबीची पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.

लाचेचा आरोप : हवालदाराचे निलंबन
भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश एकनाथ चौधरी यांच्याविरुद्ध लाच मागितल्याच्या आरोपातून गंभीर बाबी निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी बुधवार, 30 सप्टेंबर रोजी निलंबनाचा आदेश काढल्यानंतर पोलीस वर्तुाळात मोठी खळबळ उडाली.

चौधरी यांच्यावर ठपका
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणाच्या संदर्भात चौधरी यांनी एका खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडून 3 ऑगस्ट 2026 रोजी मागणी पडताळणी करण्यात आली होती. त्यामध्ये चौधरी यांच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या बाबी निष्पन्न झाल्याचे निलंबन आदेशात नमूद आहे. निलंबन आदेशात महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियमांचा भंग झाल्याचे नमूद करून चौधरी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी व त्यानुषंगाने होणार्‍या कारवाईच्या अधीन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

हवालदाराची मुख्यालयात बदली
निलंबन कालावधीत चौधरी यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव निश्चित करण्यात आले असून सक्षम अधिकार्‍याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे तसेच निलंबन काळात त्यांनी दररोज सकाळी व सायंकाळी राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय जळगाव यांच्याकडे हजेरी द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. निलंबनाच्या कालावधीत महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार निर्वाह भत्ता देण्याची तरतूदही आदेशात नमूद करण्यात आली आहे. निलंबन काळात खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिस्तप्रिय पोलीस खात्याची जनमानसात बदनामी झाल्याचे व हे वर्तन बेजवाबदारीचे असल्याचे आदेशात नमूद आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !