भुसावळ विभागाला भंगार विक्रीतून 57.40 कोटींची कमाई
भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने पर्यावरण संरक्षण आणि संसाधनांच्या प्रभावी वापराच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी करीत आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये आतापर्यंत 57.40 कोटींची भंगार विक्री नोंदविली. सप्टेंबर 2026 मध्येच विभागाने 16.91 कोटींची भंगाराची विक्री करण्यात आली. भुसावळ विभागाने 50 कोटींचा टप्पा आतापर्यंतच्या सर्वात कमी कालावधीत पार करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रभावी भंगार व्यवस्थापन, नियमित देखरेख, विविध विभागांमधील समन्वय आणि महसूलवाढीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली.
नवे मानदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल
ही उपलब्धी मंडल रेल्वे व्यवस्थापक पुनील अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्टोअर्स विभागासह सर्व संबंधित विभाग आणि कर्मचार्यांच्या समन्वित व समर्पित प्रयत्नांचे फलित आहे. ही कामगिरी रेल्वेच्या भंगार व निष्प्रयोज्य साहित्याच्या प्रभावी विल्हेवाटीसोबतच संसाधनांचा उत्पादक वापर, आर्थिक शिस्त आणि पर्यावरणीय शाश्वततेप्रती भुसावळ विभागाची बांधिलकी अधोरेखित करते. ही उल्लेखनीय कामगिरी ‘मिशन-झिरो स्क्रॅप स्टेटस’ या मध्य रेल्वेच्या संकल्पनेप्रती दृढ बांधिलकीचे द्योतक असून, भुसावळ विभाग भंगार विक्रीत नवे मानदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करत आहे.


