शासकीय धान्य खाजगी गोदामात आढळले : नगाव खुर्दच्या भावंडाविरोधात गुन्हा


अमळनेर (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : रेशन दुकानातील धान्य पोलीस पाटलाच्या खाजगी गोदामात आढळून आल्याने नगाव खुर्द येथील दोन्ही भावावर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना जमाल शेख यांनी 1 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, प्रमोदपुरी रामपुरी गोसावी हे नगाव बुद्रुक व नगाव खुर्द येथे दुकान क्रमांक 152 व 153 चालवतात. नगाव बुद्रुक च्या सरपंच सरिता पद्माकर गोसावी, विपुल किरण गोसावी, सागर भरतगीर गोसावी, रोहिदास पंढरीनाथ वारुळे, मयूर अनिल बोरसे, सागर संजयगीर गोसावी यांनी तहसीलदारांकडे 30 सप्टेंबर रोजी तक्रार केली की, रेशन दुकानदाराने रेशन साठा व शासकीय धान्य साठा हा त्याचा भाऊ प्रवीण रामपुरी गोसावी यांनी बांधलेल्या समाजाच्या खाजगी गोदामात साठवला आहे.

याबाबत नायब तहसीलदार अजय कुलकर्णी, पुरवठा निरीक्षण अधिकारी रुकसाना शेख, सचिन निकम, ग्राम महसूल अधिकारी सुधीर पाटील यांनी पंचांसमक्ष तपासणी केली असता गोदामात 29 हजार 43 रुपयांचा धान्य साठा आढळला. त्यात 13.83 क्विंटल मका, 9.39 क्विंटल ज्वारी, 1.5 क्विंटल साखर, 91.500 किलोग्राम तीन गोण्या गहू आढळला. हा माल जप्त करून शासकीय गोदामात जमा करण्यात आला. प्रमोदपुरी गोसावी आणि प्रवीण गोसावी यांनी शासकीय जादा धान्याची उचल करून खाजगी गोदामात लपवून शासनाची फसवणूक केली व धान्याचा अपहार केला म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला दोघा भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ग्रामस्थांनी रेशन दुकानदाराने अंगठे घेऊन धान्य दिला नसल्याची तक्रार करून तसे जबाब देखील अधिकार्‍यांना चौकशीत दिले होते. त्याचा अहवालदेखील जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे पाठवण्यात आला. तपास एपीआय गणेश अहिरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !