समृद्धी महामार्गावर भीषण अपघात : देवीची मूर्ती आणताना सात तरुणांचा मृत्यू ; 18 जखमी


 

अमरावती (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : नवरात्रोत्सवासाठी दुर्गा देवीची मूर्ती आणण्यासाठी शेगावला गेलेल्या वर्धा जिल्ह्यातील तरुणांवर काळाने घाला घातला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास बोलेरो पिकअपला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 7 तरुणांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमी सर्वजण वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.

वर्धा येथील सिंदी मेघे परिसरातील नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य शेगाव येथून नवरात्रोत्सवासाठी दुर्गा देवीची उंच मूर्ती आणण्यासाठी गेले होते. मूर्ती घेऊन समृद्धी महामार्गाने परतत असताना धामणगाव परिसरात रात्री सुमारे एक वाजता हा अपघात झाला.

कंटेनरची पिकअपला जोरदार धडक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, देवीची मूर्ती बोलेरो पिकअपमधून आणली जात होती. पिकअपला मागे ट्रॉली जोडलेली होती. दरम्यान, मागून भरधाव येणार्‍या कंटेनरने पिकअपला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, मूर्तीसोबत प्रवास करणार्‍या काही सदस्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले.

मृतांमध्ये सात जणांचा समावेश
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये दत्ता कुळसंगे, घनश्याम पाटील, मुनेश्वर ढोले, ओम गावंडे, प्रवीण बकाने, रोशन राऊत आणि सचिन बदलमवार यांचा समावेश आहे. अपघातात 12 जण गंभीर, तर 6 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना सुरुवातीला धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारासाठी वर्धा येथील सावंगी तसेच सेवाग्राम येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. अमरावती जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. जखमींवर सावंगी आणि सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात
प्राथमिक माहितीनुसार, पिकअपचा वेग कमी होता आणि मागे ट्रॉली जोडलेली असल्याने मागून येणार्‍या कंटेनर चालकाचा अंदाज चुकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून, अपघाताच्या कारणाचा पुढील तपास सुरू आहे. या भीषण दुर्घटनेमुळे वर्धा आणि अमरावती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !