मतदार यादी दुरुस्तीच्या बहाण्याने ज्येष्ठाची 10 लाखांची फसवणूक
निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट संदेश
पुणे (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : मतदार यादीतील नाव दुरुस्तीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी हडपसर परिसरातील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल नऊ लाख 92 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट संदेश पाठवून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाकडून बँक खात्याची गोपनीय माहिती मिळवली आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातून रक्कम परस्पर काढून घेतली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट संदेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हडपसर परिसरात राहतात. 15 ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट संदेश पाठविला. तक्रारदाराच्या वडिलांचे नाव मतदार यादीत जुळत नसल्याचे सांगून त्यांना दुरुस्तीच्या प्रक्रियेच्या नावाखाली बोलण्यात गुंतवण्यात आले.
माहितीचा केला गैरवापर
यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती मिळवली. या माहितीचा गैरवापर करून त्यांच्या बँक खात्यातून 9 लाख 92 हजार रुपये काढून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.


