चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : पुण्यातील त्रिकूट तीन गावठी कट्टे व आठ जिवंत काडतुसांसह जाळ्यात
चोपडा (शनिवार, 3 ऑक्टोबर 2026) : अवैध अग्निशस्त्रांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करत तीन गावठी कट्टे व 8 जिवंत काडतुसे जप्त केली. पुण्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून मोटारसायकल, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय सोनवणे यांना अवैधरित्या गावठी कट्ट्यांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. गुरुवार, 1 ऑक्टोबर रोजी पथकाने लासूर गावाजवळील नाटेश्वर मंदिराजवळ नाकाबंदी केल्यानंतर दुचाकी (एम.एच.18 सी.ए.2228) वर तीन संशयीत आल्यनंतर पथकाने त्यांना ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन गावठी बनावटीचे कट्टे व आठ जिवंत काडतुसे आढळल्याने ते जप्त करण्यात आले.
पुण्यातील आरोपींना अटक
पोलिसांनी केलेल्या कारवाईत साहिल दगडू आवारे (19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी, पिंपरी-चिंचवड), सौरभ संतूराम मोतीरावे (23, पिंपरी चिंचवड, चिखली गावठाण, अनाथ आश्रमाजवळ, ता.हवेली, जि.पुणे) व रोहित चंद्रकांत जुनुगर (30, पार्वती कॉम्प्लेक्स, मेहतर वस्ती, मारेवस्ती, चिखली, ता.हवेली, जि.पुणे) यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 75 हजार रुपये किंमतीचे तीन गावठी कट्टे, आठ हजारांचे आठ काडतूस, 50 हजारांची दुचाकी, 22 हजारांचे दोन मोबाईल व 12 हजारांची रोकड मिळून एक लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय सोनवणे, कॉन्स्टेबल दीपक शिंदे, कॉन्स्टेबल विशाल पाटील, प्रकाश मथुरे, गजानन पाटील, शुभम पाटील, प्रमोद पवार आदींच्या पथकाने केली.


