भुसावळातील व्यापार्‍याची फसवणूक : चौघांविरोधात गुन्हा

पोलिसांच्या नावाने तक्रारदाराच्या पत्नीला धमकावल्याचा व धनादेशावर बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे पैसे लाटल्याचा आरोप


भुसावळ (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : भाजीपाल्याच्या व्यवसायात असलेल्या शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील व्यापार्‍याची मोठ्या रकमेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयीतांनी पोलिसांच्या नावाने तक्रारदाराच्या पत्नीला फोन केला तसेच धनादेशावर बनावट स्वाक्षर्‍या करीत रक्कम उकळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
विक्की उर्फ कवडामल प्रकाशलाल चावला (रा.भुसावळ) यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून हंसराज प्रकाशलाल चावला (रा.सिंधी कॉलनी, भुसावळ), बसंतकुमार गुरनोमल मधान (रा.चोपडा), वंदना उर्फ प्रिया बसंतकुमार मधान (रा.चोपडा) व आयशा तब्बसूम पीरजादे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चावला यांच्या तक्रारीनुसार, हंसराज, बसंतकुमार व वंदना मधान यांनी फिर्यादीच्या भाजीपाला व्यवसायात असताना लोकांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम घेवून फसवणूक केली व ती परत न करता फिर्यादीला त्रास दिला.

आरोपींनी तक्रारदाराला त्याच्याच घरातून हाकलून लावल्याचा आरोप आहे तर फिर्यादीच्या बनावट व खोट्या स्वाक्षर्‍यांद्वारे शिरपूर बँक व एलआयसी शाखेतून पैसे काढले व लोकांना चेक दिले. संशयीत आयशा तब्बसुम पीरजादे (रा.चोपडा) हिने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे व चोपडा येथून पोलिसांच्या नावाने फिर्यादीच्या पत्नीला फोन करून सोन्याचे दागिने भाऊ, बहिण व मेहुण्याला देवून टाका अन्यथा जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीमुळे फिर्यादीची पत्नी घाबरून आजारी पडल्याचेही तक्रारीत नमून असून खोट्या केसेसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !