शिरपूर तालुक्यात चिमुकल्याच्या बळीनंतर बिबट्या जेरबंद


शिरपूर (रविवार, 4 ऑक्टोबर 2026)  दोन वर्षीय बालकाच्या बळीनंतर जनभावना संतप्त झाल्यानंतर वनविभागाने शोधमोहिम राबवत बिबट्याला जेरबंद केले. शिरपूर तालुक्यातील अर्थे (बु.॥) शिवारात दोन वर्षीय बालक योगेश पर्मिया सोंगळचा या बिबट्याने बळी घेतल्यानंतर जनभावना संतप्त झाल्या होत्या. 9 सप्टेंबर रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेला यश आले. बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याने अर्थे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

बालकाचा घेतला होता बळी
मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील आत्मज (पोस्ट सुस्तीखेडा) येथील पुर्मिया कमल सोंगळ हे शेतमजूर म्हणून अर्थे येथील शेख रऊफ शेख सुलेमान खाटीक यांच्या गट क्रमांक 57 मधील शेतात वास्तव्यास आहेत. अर्थे (बु.॥) शिवारात 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी ही सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा दोन वर्षीय मुलगा योगेश पर्मिया सोंगळ हा घरासमोरील अंगणात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. क्षणार्धात बिबट्याने योगेशला जबड्यात पकडून शेताच्या दिशेने ओढून नेले. मुलाला वाचविण्यासाठी आई-वडिलांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याचा पाठलाग केला. मात्र बिबट्या दाट पिकांमध्ये पसार झाला.

चिमुकल्याच्या मृत्यूने संताप
शोधमोहिमेदरम्यान दुसर्‍या दिवशी तुरीच्या शेतात योगेशचे काही अवशेष आढळून आले होते. डोक्याचा काही भाग, एक हात आणि पंजासह शरीराचे काही अवशेष मिळून आले होते. या दुर्दैवी घटनेनंतर अर्थे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, योगेश पर्मिया सोंगळ या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर अर्थे (बु.) परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण होते. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. वनविभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पिंजरे लावण्यासह ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि विशेष पथकांच्या माध्यमातून शोधमोहीम वेगाने राबविली व चिमुकल्या योगेशचा बळी घेणारा बिबट्या पिंजर्‍यात अडकल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !