रावेर पोलिसांची हातभट्टी दारूविरुद्ध धडक कारवाई
रावेर (रविवार, 4 ऑक्टोबर 2026) : रावेर तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीविरोधात रावेर पोलिसांनी धडक कारवाई केली. विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 345 लिटर दारू तसेच गूळ-मोह मिश्रण असा एकूण सुमारे 81 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती व तस्करी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कारवाईने उडाली खळबळ
रावेर तालुक्यातील काही भागांत अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहा.निरीक्षक हरिदास बोचरे, अमोल बच्छाव, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, संबंधित बीट अंमलदार तसेच डीबी पथकाने विविध भागांत धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान सुमारे 345 लिटर दारू नष्ट करण्यात आली तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे गूळ-मोह मिश्रणही नष्ट करण्यात आले. या कारवाईत एकूण सुमारे 81 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
यांच्याविरोधात गुन्हा
या प्रकरणी दीपक सुरेश भालेराव (कुसुंबा), बिस्मिल्ला चादखा तडवी (पाडला), कृष्णा मधुकर राठोड (पाल), सुपडू भिवसेन तावडे (नेहता) आणि असलम हसन तडवी (पाल) यांच्याविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातील महिलांनी स्वागत केले असून अवैध हातभट्टी दारूविरोधातील कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली आहे.
देशी दारूच्या तस्करीकडेही लक्ष देण्याची मागणी
रावेर तालुक्यातील खानापूर व अहिरवाडी परिसरातून मोठ्या प्रमाणात देशी दारू मध्यप्रदेशात तस्करी केली जात असल्याची चर्चा असून या प्रकाराकडे रावेर पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.


