रस्ता विकासाआड येणारे ‘काटे’ हटवले ; वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळेंचा थेट अॅक्शन प्लॅन !
फुलगाव फाटा ते साई बाबा मंदिर दरम्यान नगर परिषदेच्या वतीने मध्यभागी लाईट लावणार : सुनील काळेंची माहिती
वरणगाव (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिरादरम्यानचा रस्ता रुंदीकरण व दुभाजक टाकून लाईट लावून सुशोभित करण्यासाठी दहा वर्षांपासून लढा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नगरपरिषदेच्या वतीने प्रस्ताव देवून पाठपुरावा सुरू असताना गडकरी यांनी रस्ता करण्याचे आश्वासन देवूनही जळगाव प्रकल्प संचालकांची असमर्थता असल्याने काम सुरू होत नसल्याने वरणगाव नगरपरिषदेच्या वतीने प्राथमिक स्वरूपात जे होईल ते करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात आली. वरणगावकरांच्या आड येणारे काटे जे जेसीबी हटवण्यात येत असून वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.
रस्ता विकसीत करणे हेच ध्येय
वरणगावकरांसाठी हा रस्ता महत्त्वाचा असल्याने सकाळ-संध्याकाळ वरणगावकरांची जा-ये असते. मंगळवारी सकाळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या उपस्थितीत जेसीबीद्वारे रस्त्यावरील काटे हटवण्यास सुरूवात करण्यात आली. फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिराचा रस्ता विकसीत होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा संकल्प करून आता हे काम होत नाही तोपर्यंत लोकचळवळ सुरू करून जनआंदोलन उभारणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले. लवकरच या रस्त्याच्या मध्यभागी आधुनिक लाईट नगरपरिषदेच्या वतीने लावण्यात येणार असल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक विनोद झोपे, कामगार नेते मिलिंद मेढे, उपनगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेवक नाना चौधरी, शहराध्यक्ष सुनील माळी, आकाश निमकर, मिलिंद भैसे, हितेश चौधरी, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अजमल खान, फजल शेख, छोटू सेवतकर, विजय सोनार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


