निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांसह ईव्हीएम हटावसाठी जळगावात महाविकास आघाडीचा विराट मोर्चा


जळगाव (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्यावी, ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, मतदार यादीतील एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी जळगावात महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले.

विराट मोर्चाने दणाणले शहर
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यासह मनसे, समाजवादी पक्ष आणि मित्रपक्षांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 6 रोजी मोर्चा काढण्यात आला. दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अर्थात शिवतीर्थ मैदानापासून मोर्चाला सुरुवात होऊन त्याचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाला करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा पोहोचल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

एसआयआर प्रक्रिया रद्दची मागणी
मतदार यादीसंदर्भात राबविण्यात येणारी एसआयआय प्रक्रिया तत्काळ रद्द करावी अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात आली. या प्रक्रियेमुळे मतदारांना अडचणी निर्माण होत असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केला. मतदारांना योग्य न्याय मिळावा आणि प्रक्रिया सुरळीत करावी, अशी मागणीही करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करत ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही आंदोलनात करण्यात आली. ईव्हीएममधील बिघाड, बॅटरी डाऊन होणे आणि मतदानाच्या आकडेवारीबाबत निर्माण होणार्‍या प्रश्नांचा दाखला देत बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा, अशी भूमिका महाविकास आघाडीने घेतली. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचा मुद्दाही आंदोलनात प्रमुखपणे मांडण्यात आला. कमी पावसामुळे शेतकरी संकटात सापडल्याचा दावा करत संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकर्‍यांना हेक्टरी एक लाख रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यांचा आंदोलनात सहभाग
या आंदोलनात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निरीक्षक भास्करराव काळे, माजी आमदार शिरीष चौधरी, रवींद्रभैय्या पाटील , शिवसेना उबाठाचे उपनेते गुलाब वाघ, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, धनंजय चौधरी, दीपक सोनवणे, तुकाराम वाघ, जमील शेख, मुक्ती हारून, श्याम तायडे, कल्पिता पाटील , शरद तायडे, अशोक लाडवंजारी, रोहिणी पाटील, दीपक पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !