मंत्री संजय सावकारे यांचा पाठपुरावा : भुसावळात लवकरच उभारणार ‘उमेद मॉल’ !
19.99 कोटींची प्रशासकीय मान्यता : महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
भुसावळ (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उभारण्यात येणार्या ‘उमेद मॉल’ (जिल्हा विक्री केंद्र) या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने 19 कोटी 99 लाख 99 हजार 295 रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2026 रोजी जारी करण्यात आल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. भुसावळचे आमदार व मंत्री संजय सावकारे यांनी या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर ‘उमेद मॉल’ला मंजुरी मिळाली आहे.
महिलांच्या उत्पादनांना आता हक्काची बाजारपेठ
महिला स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळावी, यासाठी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
20 कोटींच्या उंबरठ्यावर प्रकल्पाचा खर्च
शासन निर्णयानुसार, भुसावळ येथील उमेद मॉलच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी 1999.99 लाख रुपये, म्हणजेच जवळपास 20 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पात तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला यांचा समावेश आहे तर इमारतीचे एकूण बांधकाम क्षेत्र 5175.42 चौरस मीटर प्रस्तावित आहे. शहरातील यावल रस्त्यावरील गुरांच्या दवाखान्याजवळील जागेवर लवकरच ‘उमेद मॉल’च्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
महिला उत्पादनांना मिळणार विक्रीची संधी
ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांकडून विविध प्रकारच्या वस्तू व उत्पादने तयार केली जातात मात्र या उत्पादनांना योग्य बाजारपेठ आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची पुरेशी संधी मिळणे आवश्यक असते. उमेद मॉलच्या माध्यमातून अशा उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. भुसावळ येथे जिल्हा विक्री केंद्र उभारल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील महिला बचत गटांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकते. या प्रकल्पामुळे महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे.
इमारतीत आधुनिक सुविधांचा समावेश
शासन निर्णयातील तरतुदींनुसार, इमारतीमध्ये विद्युत व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, लँडस्केपिंग, वृक्षारोपण, वातानुकूलन, लिफ्ट आणि सीसीटीव्ही यांसारख्या सुविधांचा समावेश प्रस्तावित आहे. तसेच हरित इमारत संकल्पना, नैसर्गिक प्रकाशयोजना, वायुवीजन आणि पाण्याच्या व ऊर्जेच्या कार्यक्षम वापरावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला पदाधिकार्यांसाठी प्रसाधनगृहांसह विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्याचेही निर्देश आहेत. याशिवाय अपंग व्यक्तींना सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रॅम्प, रेलिंग आणि आवश्यक सोयींची तरतूद करण्याचे नमूद करण्यात आले आहे.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना : मंत्री संजय सावकारे
भुसावळ शहरासाठी मंजूर झालेला ‘उमेद मॉल’ हा केवळ इमारत बांधकामाचा प्रकल्प नसून महिला स्वयंसहायता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा उपक्रम ठरणार असल्याचे मंत्री संजय सावकारे म्हणाले. शहरी व ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता समूहांकडून विविध प्रकारच्या वस्तू व उत्पादनांना आता योग्य बाजारपेठ व योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची पुरेशी संधी या माध्यमातून उपलब्ध होणार असल्याचेही मंत्री सावकारे यांनी सांगितले.


