पाचोरा शहरात भरदिवसा शेतकर्‍याकडील दोन लाख 15 हजारांची रोकड लांबवली


पाचोरा (शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2026)  : शेतकर्‍यांने शेती कामासाठी बँकेतून दोन लाखांची रोकड काढल्यानंतर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी शेतकर्‍याचे लक्ष विचलीत करीत रोकड असलेली पिशवी लांबवली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास शहरात घडल्याने मोठी खळबळ उडाली. संशयित चोरटे रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

काय घडले पाचोरा शहरात ?
उत्राण (ता. एरंडोल) येथील प्रकाश जिवराम पाटील यांचे पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते आहे. शेतीसाठी बियाणे खरेदी करणे, शेतमजुरांची मजुरी देणे आणि इतर शेतीकामांचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी शुक्रवार, 9 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे एक वाजता बँकेतून दोन लाख रुपये काढले होते. त्यांच्याकडे आधीपासून असलेली 15 हजारांची रोकड त्यांनी एका पिशवीत ठेवली. ही पिशवी दुचाकी (एम.एच.19 डी.एच.9238) क्रमांकाच्या मोपेडच्या डिक्कीमध्ये ठेवत असताना दुचाकीवरून आलेल्या संशयीतापैकी एकाने आपल्या खिशातील 10 आणि 20 रुपयांच्या काही नोटा जमिनीवर टाकत शेतकरी प्रकाश पाटील यांना, ‘तुमचे पैसे खाली पडले सांगत त्यांचे लक्ष विचलित केले. आपलेच पैसे पडल्याचे समजून प्रकाश पाटील ते उचलण्यासाठी गेले असता याचवेळी दुसर्‍या चोरट्याने मोपेडच्या डिक्कीतील दोन लाख 15 हजार रुपये असलेली पिशवी काढून धूम स्टाईल पोबारा केला.

पाचोरा पोलिसांनी घेतली धाव
शेतकर्‍याने पैसे उचलताच त्यास आपली रोकड असलेली पिशवी लांबवण्यात आल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, जितेंद्र पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. महाराष्ट्र ग्रामीण बँकेलगत असलेल्या श्रेयस हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यात संशयित चोरटे कैद झाल्याचे सांगण्यात आले. फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !