माजी मंत्री एकनाथराव खडसेंच्या फार्म हाऊसवरून ड्रोन नव्हे उडाले ‘प्रशिक्षण विमान’
‘रेकी’ करण्यात आल्याचा दावा ठरला निष्पप्रभ : चर्चांना मिळणार पूर्णविराम !
जळगाव (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याचा संशय खुद्द माजी मंत्री खडसेंनी करीत पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने केलेल्या चौकशीत तक्रारीच्या दिवशी ड्रोन नव्हे तर प्रशिक्षण विमानाने त्या भागातून गेल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या या दाव्यानंतर आमदार खडसे यांनी फार्म हाऊसची रेकी केल्याचा दावा निष्प्रभ ठरला आहे.
विमान प्राधिकरणाने केला खुलासा
आमदार खडसे यांनी फार्म हाऊसची ते घरी नसताना 28 सप्टेंबर 2026 रेकी करण्यात आल्याचा संशय करीत जिल्हा पोलीस प्रशासनाकडे 2 ऑक्टोबरला तक्रार केली होती. या तक्रारीची जळगाव जिल्हा पोलिसांकडून सविस्तर चौकशी करण्यात आली. प्राथमिक चौकशीत तक्रारदाराने ड्रोनद्वारे रेकी केल्याचा व्यक्त केलेला संशय दूर झाला असून संबंधित दृश्ये ही जळगाव विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाची असल्याचे संबंधित अधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. तक्रारीची सत्यता पडताळण्यासाठी भारतीय विमानपत्तन प्राधिकरण, जळगाव विमानतळ तसेच संबंधित विमान प्रशिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार करण्यात आला. तक्रारीत नमूद केलेल्या तारखेला परिसरात कोणत्या प्रकारची विमान हालचाल झाली, याबाबत अधिकृत माहिती मागविण्यात आली.
‘ते’ तर प्रशिक्षण विमान
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडून प्राप्त माहितीनुसार, जळगाव विमानतळावर दोन फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन्स कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत बालापूर व अमरावती परिसरातून नियमितपणे प्रशिक्षण उड्डाणे केली जातात. उपलब्ध अभिलेखांनुसार 28 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7.40 वाजता जळगाव विमानतळावरून बाळापूर परिसराकडे पुढे अमरावतीच्या दिशेने प्रशिक्षण विमानाने उड्डाण केले होते. या संदर्भात जळगाव विमानतळ निर्देशक हर्ष कुमार त्रिपाठी, मुख्य सुरक्षा अधिकारी हेमंत गौतम, एअरक्राप्ट फिट फ्लाय मॅनेजर महेंद्रकुमार सिंह व संबंधित विमानतळ अधिकार्यांशी पोलिसांनी चर्चा क्ेली.
या प्रकरणाच्या अनुषंगाने भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या अधिकार्यांसह संबंधित विमानतळावरील अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली. तक्रारदाराने उपलब्ध करून दिलेले व्हिडिओ संबंधित अधिकार्यांना दाखविण्यात आले. संबंधित दृश्ये ही ड्रोनची नसून जळगाव विमानतळावरून उड्डाण केलेल्या प्रशिक्षण विमानाची असल्याचे अधिकार्यांनी स्पष्ट केले. तसेच पोलिसांनी तक्रारीत नमूद केलेल्या परिसरात प्रत्यक्ष चौकशी केली. ‘प्लेन फाईंडर’ या अॅपवरील विमान वाहतुकीच्या नोंदींचीही पडताळणी करण्यात आली. या तपासणीत संबंधित वेळेच्या आसपास परिसरातून विमान जात असल्याची माहिती उपलब्ध झाल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
खडसेंचा दावा ठरला निष्प्रभ
प्राथमिक चौकशीत ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय आता संपुष्टात आला असून संबंधित दृश्ये प्रशिक्षण विमानाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात उपलब्ध माहिती, अधिकृत नोंदी आणि प्रत्यक्ष पडताळणीच्या आधारे जळगाव जिल्हा पोलिसांनी चौकशी केली असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


