भुसावळात उत्कृष्ट आरासमध्ये मातृभूमी प्रतिष्ठान तर मिरवणुकीसाठी विघ्नहर्ता मंडळ प्रथम
भुसावळात ‘गणराया अवॉर्ड 2026’ वितरण ; शहर हद्दीत जागृती गणेश मंडळ प्रथम
भुसावळ (शनिवार, 10 ऑक्टोबर 2026) : विघ्नहर्त्या गणरायाचा उत्सव अलीकडे शांततेत पार पडला. या उत्सवासाठी भुसावळ पोलीस दलातर्फे ‘गणराया अॅवॉर्ड 2026’ संकल्पना राबवण्यात आली. या स्पर्धेत उत्कृष्ट आरास/स्थापना व शिस्तबद्ध मिरवणुकीच्या आधारावर मंडळांचा गुणानुक्रम निश्चित करण्यात आला. क्रमांक पटकावणार्या गणेश मंडळांचा, पर्यवेक्षकांचा आणि विशेष सहकार्य करणार्या व्यक्तींचा अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या उपस्थितीत शनिवार, 10 रोजी प्रभाकर हॉल्मध्ये आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात आगामी नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी बैठकही घेण्यात आली व मंडळांना पोलिसांना सूचनाही केल्या.
यांची होती उपस्थिती
शहरातील प्रभाकर हॉलमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे महेश गायकवाड, वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक राहुल भंडारे उपस्थित होते.
उत्कृष्ट गणेश मंडळांचा गौरव
गणराया अवॉर्डअंतर्गत भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर, भुसावळ तालुका आणि नशिराबाद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गणेश मंडळे, पर्यवेक्षक आणि विशेष सहकार्य करणार्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. गणेशोत्सवात उत्कृष्ट देखावे, सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरक मूर्ती, स्वच्छता, रक्तदान शिबिरे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणार्या मंडळांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बाजारपेठ हद्दीत या मंडळांनी पटकावला क्रमांक
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उत्कृष्ट आरास/स्थापनेसाठी मातृभूमी क्रीडा प्रतिष्ठान गणेश मंडळाने प्रथम तर जय गणेश फाउंडेशनला द्वितीय व न्यू इंडिया सब्जी मंडि मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. डीजे व गुलालाला फाटा देत पारंपरीक वाद्यांसह बैलगाडीवर मिरवणूक काढणार्या विघ्नहर्ता गणेश मंडळाने प्रथम तर न्यू स्टूंड गणेश मंडळाने द्वितीय व सर्वोदय मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
विशेष सहकार्यासाठी यांचा सन्मान
विशेष सहकार्य करणार्या योगेश पाटील, बद्रीनारायण अग्रवाल, प्रवीण वेडू ठाकूर, वैभव पवार आदींचा तर पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलेल्या पर्यावरण मित्र नाना शंकर पाटील, राध्येश्याम लाहोटी, शीतल भराडे, राजेश्री देशमुख, महेश पाटील आदींचा सन्मान करण्यात आला.
शहर हद्दीत जागृती मंडळ प्रथम
भुसावळ शहर ठाणे हद्दीत उत्कृष्ट आराससाठी जागृती गणेश मंडळ, कंडारीचा राजा प्रथम तर श्री शारदा गणेश मंडळ, शारदा नगर, भुसावळने द्वितीय व शिवनेरी गणेश मंडळ, कपिलेश्वर महादेव मंदिर, कंडारीने तृतीय क्रमांक पटकावला. विशेष सहकार्य करणार्या अजय डागोर व चेतन पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
भुसावळ तालुका हद्दीत साकरीतील मंडळ प्रथम
भुसावळ तालुका हद्दीत उत्कृष्ट आरास व सामाजिक उपक्रम राबवणार्या साकरी येथील ललकार गणेश मंडळाने प्रथम तर साकेगावच्या दादा ग्रुप गणेश मंडळाने द्वितीय तसेच खडका येथील भाले गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. विशेष सहकार्य करणार्या जितेंद्र काटे व राहुल चौधरी यांचा सन्मान करण्यात आला.
नशिराबाद हद्दीत द्वारका गणेश मंडळ प्रथम
नशिराबाद ठाणे हद्दीत उत्कृष्ट देखावा साकारणार्या द्वारका नगर गणेश मंडळाने प्रथम तर श्रीराम गणेश मित्र मंडळाने द्वितीय व हनुमाने पेठ गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. विशेष सहकार्य करणार्या चेतन पाटील व मोहम्मद महताब आलम यांचा सन्मान करण्यात आला. शामकांत कुमावत व नीलकंठ भंगाळे यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले.
नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन
आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखावी तसेच ध्वनिप्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासह शासनाने निर्धारित केलेल्या नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी केले. उत्सव काळात नागरिकांनी शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या बैठकीला शांतता समितीचे सदस्य, नवरात्रोत्सव व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, गणराया अवॉर्डचे पर्यवेक्षक, डीजे चालक-मालक तसेच महिला समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.


