दिवाळीच्या गर्दीत विनातिकीट प्रवास : 331 फुकट्यांकडून तीन लाखांचा दंड वसुल
भुसावळ विभागातील आठ प्रमुख स्थानकांवर ‘फोर्ट्रेस’ तिकीट तपासणी मोहीम ; गर्दीच्या पार्श्वभूमीवर तपासणीला वेग
भुसावळ (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत असताना विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) पुनीत अग्रवाल यांच्या सूचनेनुसार आणि वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील प्रमुख स्थानकांवर तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने 28 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या ‘फोर्ट्रेस तिकीट तपासणी मोहिमेत’ तिकीटविषयक 331 प्रकरणांमध्ये कारवाई करून तीन लाख सात हजार 625 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे गाड्यांना वाढली गर्दी
दिवाळीच्या सुट्यांमुळे प्रवाशांची ये-जा वाढली आहे. अनेक रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी होत असून अशा परिस्थितीत प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासोबतच विनातिकीट प्रवास, अनियमित तिकीट आणि विनाबुक केलेल्या सामानाच्या प्रकारांना प्रतिबंध घालण्यावर रेल्वे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. वैध तिकीट घेऊन प्रवास करणार्या प्रवाशांना गैरसोय होऊ नये आणि रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण व्हावे, यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरत आहे.

आठ प्रमुख स्थानकांवर तपासणी
बुधवार, 28 ऑक्टोबर रोजी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत भुसावळ, जळगाव, नाशिक रोड, मनमाड, खंडवा, अकोला, बडनेरा आणि अमरावती या आठ प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश होता. या मोहिमेत मुख्य वाणिज्य निरीक्षक, वाणिज्य पर्यवेक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचे जवान सहभागी झाले होते. तपासणीदरम्यान विनातिकीट प्रवास, अनियमित तिकीट आणि विनाबुक केलेले सामान अशा प्रकारांत 331 प्रकरणे आढळून आली. या प्रकरणांतून 3 लाख 7 हजार 625 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे कायद्यानुसारही कारवाई
तिकीट तपासणीसोबतच रेल्वे कायद्याच्या विविध कलमांनुसारही कारवाई करण्यात आली. अस्वच्छता पसरविल्याच्या एका प्रकरणात एक हजार रुपये, रेल्वेच्या मालमत्तेवर अनधिकृत प्रवेश केल्याच्या 18 प्रकरणांत नऊ हजार रुपये, अनधिकृत विक्रीच्या एका प्रकरणात दोन हजार रुपये आणि धूम्रपानाच्या एका प्रकरणात 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. या चार प्रकारांतील एकूण 21 प्रकरणांतून 12 हजार 500 रुपयांचा दंड वसूल झाला.
पुढेही तपासणीवर भर
दिवाळीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांनी प्रवासापूर्वी वैध तिकीट काढावे आणि रेल्वेचे नियम पाळावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तिकीट खिडक्या, स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रे (एटीव्हीएम), अधिकृत तिकीट विक्रेते, आयआरसीटीसीचे संकेतस्थळ आणि ‘रेल वन’ अॅपच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. विनातिकीट प्रवासामुळे दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे प्रवाशांनी नियमांचे पालन करून सहप्रवाशांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


