जळगाव जिल्हा पोलीस दलाचा पुढाकार ; भुसावळात शेकडो युवक-युवतींना पोलीस भरतीचे मार्गदर्शन


भुसावळ (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : पोलीस दलात सेवा बजावण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्‍या तरुण-तरुणींसाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रेल्वे ग्राउंडवर भव्य ‘पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर’ घेण्यात आले. गुरुवार, 29 रोजी दुपारी चार वाजता आयोजित या शिबिराला परिसरातील शेकडो युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पोलीस अधीक्षकांची संकल्ना
शिबिराचे आयोजन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक, जळगाव संदीप गावित यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान उपस्थित पोलीस अधिकारी व प्रशिक्षकांनी भावी उमेदवारांना भरती प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन
मैदानी चाचणी- धावणे व इतर शारिरिक चाचण्यांमध्ये अधिकाधिक गुण कसे मिळवावेत, स्टॅमिना कसा वाढवावा आणि सरावाचे योग्य नियोजन कसे असावे, याविषयी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

लेखी परीक्षा तयारी
बदलत्या अभ्यासक्रमाचे स्वरूप, वेळेचे व्यवस्थापन, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता व गणित या विषयांची अचूक तयारी कशी करावी, याच्या उपयुक्त टिप्स देण्यात आल्या.

कागदपत्रांची पडताळणी
भरतीदरम्यान कोणत्याही तांत्रिक त्रुटीमुळे अपात्रता येऊ नये म्हणून आवश्यक प्रमाणपत्रे व कागदपत्रांची योग्य पूर्तता कशी करावी, याविषयी माहिती देण्यात आली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमात भुसावळ तालुक्याचे प्रभारी परिवेक्षाधीन उपअधीक्षक प्रशांत दरेकर, भुसावळ शहर निरीक्षक महेश गायकवाड, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड, जळगाव पोलीस मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुग्रवार, शहर वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक राहुल भंडारे, सहा.निरीक्षक शत्रुग्न पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी उपस्थित होते. ग्रामीण व शहरी भागातील तरुणांनी शिस्तीचे पालन करून कठोर परिश्रम घ्यावेत, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी शिबिरातून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त करत पोलीस दलाच्या या उपक्रमाचे आभार मानले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !