उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून महिलांची ‘दिवाळी गोड’ : भुसावळात मंत्री संजय सावकारे
महिला उद्योजक मेळाव्याला भुसावळकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : नागरिकांना भेट देण्याचे आयोजकांचे आवाहन
भुसावळ (शनिवार, 31 ऑक्टोबर 2024) : महिला उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील महिलांच्या हाताला मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांची दिवाळी गोड झाली आहे. प्रतिष्ठा मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार प्रायोजक तथा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे काढले. शहरातील ब्राह्मण संघात 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरदरम्यान आयोजित मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्घाटनाच्या दिवशी भुसावळकरांसह तालुकावासीयांनी भेट दिल्याने महिला उद्योजकांच्या चेहर्यावर स्मित हास्य फुलले.
उपक्रमाचे यंदा 14 वे वर्ष
शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षी महिला उद्योजक मेळाव्याचे ब्राह्मण संघात आयोजन केले जाते व यंदा उपक्रमाचे 14 वे वर्ष हेाते. या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होते शिवाय महिलांच्या हाताला या काळात रोजगारही उपलब्ध होतो. विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेमुळे महिला उद्योजकांच्या दोन पैशांची बचत होवून शहरासह परिसरातील नागरिक भेट देत असल्याने स्थानिक वस्तूंचे उत्तम प्रकारे मार्केटींगदेखील होते व महिलांची दिवाळी गोडही होते.

मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
यंदाच्या महिला उद्योजक मेळाव्यात दिवाळी सणाला लागणार्या विविध वस्तू, दिवाळी पदार्थ तसेच घर सजावटीचे साहित्य हे एकाच छताखाली ब्राह्मण संघात उपलब्ध करून देण्यात आले. 30 ऑक्टोबरपासून आयोजित हा मेळावा 1 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. सणा-सुदीच्या काळात महिलांच्या हाताला रोजगार मिळाल्याने त्यांच्यात स्वावंलबी झाल्याची भावना निर्माण झाली आहे. यंदाच्या मेळाव्यात शहर व तालुक्यातील 200 वर महिलांनी आपले स्टॉल लावले आहेत.
उपक्रमाचे कौतुक करावे तेव्हढे कमी : मंत्री सावकारे
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी अपनाओचा नारा दिला असून या माध्यमातून देशातील चलन देशातच राहण्यास मदत होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून हा उद्देश सफल झाल्याचे सांगून त्यांनी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उपक्रमाचे यावेळी तोंड भरून कौतुक केले. सेवाभावी वृत्तीने राबवण्यात येणारा उद्योजक मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून महिलांची दिवाळी गोड झाल्याचे ते म्हणाले.
या मान्यवरांची उपस्थिती
मेळाव्याप्रसंगी प्रायोजक तथा मंत्री संजय सावकारे यांच्यासह डॉ.केतकी पाटील, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे तसेच स्थानिक नगरसेविका, नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी आभार मानले.
200 वर स्टॉल : मंडपाद्वारे केली सोय
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या यंदाच्या मेळाव्याला यंदा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. तब्बल दोनशे महिला उद्योजकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे खाद्य पदार्थांसाठी स्वतंत्र स्टॉल लावण्यात आले. बाह्मण संघाबाहेर मंडप टाकून या उद्योजकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याने उद्योजकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
भुसावळकरांनी एकवेळ अवश्य भेट द्यावी
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, स्थानिक स्तरावरच महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे शिवाय महिलांसाठी विनामूल्य स्टॉल लावून देण्यात आल्याने त्यांच्या दोन पैशांची बचत होवून या माध्यमातून रोजगाराद्वारे त्यांची दिवाळी गोड होणार आहे. भुसावळ शहर व ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक स्तरावरच खरेदी करावी व मेळाव्याला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


