रावेरातील गुरे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात : गुरे चोरीचा गुन्हा उघडकीस


रावेर (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : रावेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोठ्यातून गाय चोरी करणार्‍या तीन आरोपींना अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या कारवाईमुळे पशुधन चोरीच्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे.

काय घडले रावेरात ?
रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील रहिवासी संतोष देविदास पाटील (42) यांच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये दोन गायी व तीन म्हशी बांधलेल्या होत्या. 28 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री सुमारे 2.30 वाजण्याच्या सुमारास गोठ्यातून गुरांच्या आवाज आल्याने ते पाहण्यासाठी गेले असता, गोठ्यातील बांधलेल्या जनावरांपैकी एक गाय दिसून आली नाही. यानंतर त्यांनी गाय चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

सीसीटीव्हीद्वारे गुन्हा उघडकीस
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदारांना तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करीत माहिती संकलित करून संशयित आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर आरोपी शेख मुस्ताक शेख इसाक (38, रा. कुरेशी मोहल्ला, रसूलपूर, हल्ली मुक्काम मदीना कॉलनी, रावेर), शेख अक्रम शेख असलम (25, जुनी नगरपालिका समोर, इमामवाडा, रावेर) व शेख समीर शेख कलीम (26, मदिना कॉलनी, रावेर) यांना अटक करण्यात आली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि फैजपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह गुन्हे शोध पथकातील हवालदार प्रमोद पाटील, हवालदार विशाल पाटील, हवालदार सुकेश तडवी, हवालदार श्रीकांत चव्हाण, हवालदार विकारोद्दीन शेख, हवालदार योगेश पाटील आदींनी कारवाईत सहभाग घेतला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !